एक्झिट पोलनुसार महायुतीची सत्ता

महाराष्ट्रात सातपैकी दोन संस्थांचा मविआला कौल


20th November, 11:52 pm
एक्झिट पोलनुसार महायुतीची सत्ता

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. सायं. ५ वाजेपर्यंत राज्यात ५८.२५ टक्के मतदान झाले होते. काही किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. जनतेने कौल महायुतीला दिला की महाविकास आघाडीला, हे शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी कळणार आहे. मतदान पार पडल्यानंतर विविध संस्थांनी आपले ‘एक्झिट पोल’ जाहीर केले आहेत. सातपैकी पाच एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येऊ शकते, तर दोघांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
एक्झिट पोल्सनुसार अपक्षांना अंदाजे १८ ते २० जागा मिळतील, असे दिसून येत आहे. प्रत्यक्षात निकाल लागल्यानंतर हा आकडा वाढला तर ते ‘किंगमेकर’ ठरू शकतात. एक्झिट पोलमधून सरासरी १४० जागा महायुतीला, तर १३० जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात, असे दिसून येत आहे. लोकशाही रुद्र आणि इलेक्टोरल एज यांनी महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमताजवळ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.
एक्झिट पोलनुसार भाजपला सर्वाधिक जागा मिळत असल्या तरी सरकार स्थापन करण्यासाठी शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घ्यावीच लागणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीलाही मोठ्या अपेक्षा या पोलमधून दिसून येत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कमी जागा मिळत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक १४९ उमेदवार उभे केले होते. त्यानंतर काँग्रेसचे १०१, शिवसेना ( उद्धव ठाकरे) पक्षाचे ९५, शिवसेना (शिंदे) पक्षाचे ८१, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ८६, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे ५९, मनसेचे १२५, वंचितचे २०० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. २,०८६ अपक्ष उमेदवारांनीही आपले नशीब आजमावले.
एक्झिट पोल म्हणजे काय ?
निवडणुकीचा निकाल काय असेल, याचा अंदाज म्हणजे एक्झिट पोल होय. एक्झिट पोल्स हे विशिष्ट प्रकारच्या सर्व्हेवर अवलंबून असतात. कुठल्या मतदारसंघात कसा कल आहे, लोकांना काय वाटते, याबाबतचा अंदाज घेऊन हे पोल्स जाहीर केले जातात. यासाठीचा सर्व्हे थेट मुलाखती घेऊन, टेलिफोनवर बोलून किंवा ऑनलाईन प्रश्नावलीला मिळालेल्या उत्तरांमधून काढलेल्या निष्कर्षांवर आधारित असतो.