मुख्यमंत्री : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन
रोपाला पाणी घालून इफ्फीचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत श्री श्री रविशंकर, खासदार सदानंद शेट तानावडे, शेखर कपूर, आमदार डिलायला लोबो व इतर. नारायण पिसुर्लेकर
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आणि गोवा यांच्यात वेगळेच नाते निर्माण झाले आहे. इफ्फी म्हटले की गोवा आणि गोवा म्हटले की इफ्फीची आठवण येते. इफ्फीने गोव्यासाठी खूप काही दिले. इफ्फीमुळे गोव्याला जागतिक स्तरावर मान-सन्मान मिळाला आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. दोना पावला येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर बुधवारी सायंकाळी रंगलेल्या ५५ व्या इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
उद्घाटन सोहळ्यात विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा रसिकांनी आस्वाद घेतला. या सोहळ्याला बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलाकार उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी २००४ साली गोव्यात प्रथमच इफ्फीचे आयाेजन केले होते. तेव्हापासून सलग २० वर्षे इफ्फी गोव्यात होत आहे. इफ्फीमुळे गोव्यात विविध साधनसुविधा उभारण्यात आल्या. या महोत्सवाला भेट देणारे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलाकारांचे आम्ही स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन आणि पाठिंबा यांमुळे इफ्फीत दरवर्षी अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकलेले केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अभासी पद्धतीने व्हिडीओच्या माध्यमातून आपला संदेश दिला. ते म्हणाले, चित्रपट क्षेत्राच्या विकासासाठी इफ्फी मैलाचा दगड ठरत आहे. कन्टेट क्रिएटरांची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कन्टेट क्रिएटर भारताची तेजस्वी संस्कृती, जीवनशैली, खानपान यांचा प्रसार करतात. आता उत्तम तंत्रज्ञानाची त्यांना साथ मिळत असल्याने ते प्रभावीपणे आपली भूमिका पार पाडू शकतील. या महोत्सवातून आम्हाला तुमच्याकडून नव्या कल्पना मिळतील, नवयुवकांना त्यांच्या क्षेत्रातील चांगले गुरु मिळतील, असा विश्वासही मंत्री वैष्णव यांनी व्यक्त केला. अभिनेते अभिषेक बॅनर्जी आणि भूमी पेडणेकर यांनी सूत्रसंचालन केले.
सोहळ्यातील कार्यक्रम
मोहम्मद रफी, तपन सिन्हा, अक्कीनेनी नागेश्वर राव, राज कपूर या चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अभिनेते बोमन इराणी यांनी आपला जीवनप्रवास कथन केला.
चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांचे पोस्टल स्टॅम्प प्रकाशित करण्यात आले.
सुप्रसिद्ध अभिनेते नागार्जुन आणि त्यांच्या पत्नी अमला यांचा सत्कार करण्यात आला.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या जीवनावर आधारित महावीर जैन यांनी निर्माण केलेल्या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले.
रणदीप हुडा यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाने भारतीय पॅनारोमाचा शुभारंभ होणार आहे. हुडा यांचाही सन्मान करण्यात आला.
‘फौजी २’ आणि ‘काकभुशुंडी रामायण’ या मालिका दूरदर्शनवर दाखवल्या जाणार आहेत. यातील कलाकार आणि दिग्दर्शकांनी आपले मत व्यक्त केले.
अभिनेत्री मानुशी छिल्लर, इशान खट्टर, ऑस्ट्रेलियाचे कलाकार आणि इतरांनी नृत्याविष्कार सादर केला.
कलाकार मनोरंजन करून लोकांची मने जिंकतात. परंतु त्यांच्याही जीवनात दुःख, संकटे असतातच. त्यामुळे कलाकारांनी आपले मानसिक आरोग्य उत्तम ठेवणे गरजेचे आहे. ज्येष्ठ कलाकारांनी या क्षेत्रात येणाऱ्या नवख्या तरुणांना मार्गदर्शन करावे व त्यांचा आत्मविश्वास वाढवावा.
_ श्री श्री रविशंकर, आर्ट ऑफ लिव्हिंग