पंधरा दिवसांची मुदत, १.४४ लाख चौ. मी. जागेत अतिक्रमण
खडपावाडा, कुचेली म्हापसा येथे कोमुनिदादच्या जागेत उभारलेली बेकायदा घरे.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : खडपावाडा येथील कुचेली कोमुनिदादच्या १.४४ लाख चौरस मीटर जमिनीवरील बेकायदेशीररीत्या घरांचे बांधकाम करणाऱ्यांना उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासक पांडुरंग गाड यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या सुमारे दीड लाख चौ.मी. जागेत दीडशे ते दोनशे घरे उभारण्यात आली आहेत.
म्हापसा शहर पीटी शीट क्रमांक १, चलता क्रमांक १०/३ मधील ५३,३२५ चौ.मी. आणि पीटी शीट क्रमांक २, चलता क्र. ११/१ मधील ९०,८०० चौ.मी. अशा एकूण १ लाख ४४ हजार १२५ चौ.मी. कुचेली कोमुनिदादच्या जमिनीवर कायद्याचे उल्लंघन करून अवैधपणे बांधकाम उभारण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार, उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकांनी तिथे बेकायदा बांधकाम केलेल्या सर्व लोकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली आहे. संबंधितांवर कारवाई का केली जाऊ नये, याचे लिखित स्पष्टीकरण १५ दिवसांत प्रशासक कार्यालयात सादर करावेत. ही नोटीस दि. १५ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आली आहे. संबंधितांनी अतिक्रमण करून या जागेत घरे बांधली आहेत. दिलेल्या मुदतीत उत्तर देण्यास असमर्थ ठरल्यास प्रकरण एकतर्फी ठरवून पुढील कार्यवाही केली जाईल, असे निर्देशही कोमुनिदाद प्रशासक पांडुरंग गाड यांनी दिले आहेत.
स्मशानभूमीसाठी संपादित जमिनीवर अतिक्रमण
दरम्यान, वरील पीटी शीट व चलता क्रमांकातील ३०,१८७ चौ.मी. जमीन सरकारने सर्वधर्मिय स्मशानभूमीसाठी संपादित केली होती. दि. १२ व १३ नोव्हेंबर रोजी या जमिनीतील बेकायदा ३६ पैकी ३२ घरे उपजिल्हाधिकाऱ्यांनी जमिनदोस्त केली होती. चार घरांच्या मालकांना बांधकामे स्वत:हून पाडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.