मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट : तपास योग्य पद्धतीने सुरू
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणांत पोलीस अधीक्षकांनी कुणालाही क्लीन चिट दिलेली नाही. त्यांनी क्लीन चिट हा शब्दच वापरलेला नाही. या प्रकरणी कुणालाही सोडले जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. सोमवारी त्यांनी याविषयी माध्यमांशी संवाद साधला.
तपासात पोलिसांवर कोणताही दबाव नाही. त्यांना पूर्णपणे मोकळीक देण्यात आली आहे. पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत. याबाबत पहिले प्रकरण बाहेर आल्यावर मी लोकांना अशा प्रकरणांची माहिती देण्याचे आवाहन केले होते. आम्ही एका प्रकारे स्वेच्छा दखल पद्धतीप्रमाणे याची दखल घेतली होती. यानंतर लोकांनी पुढे येऊन माहिती देणे सुरू केले. नाहीतर लोक घाबरून पुढे येतच नव्हते. सध्याचा तपास पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. पोलिसांना मुक्त हस्त दिला असल्याने त्यांनी आवश्यक त्या सर्वांना अटक करून तपास करावा, अशा सूचना दिल्या आहेत. लोकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणांत गुंतलेल्या व्यक्ती सुटणार नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितले.
पत्रकार परिषदेत पोलीस महासंचालकांनी क्लीन चिट हा शब्द वापरला नव्हता. त्यानंतर मी स्वतः त्यांच्याशी फोनवर संवाद साधला होता. आपण कुणालाही क्लीन चिट दिली नसल्याचे त्यांनी सांगितले होते. असे असतानाही विरोधकांनी क्लीन चिट हा शब्द कुठून आणला, हे माहिती नाही. या प्रकरणी तपास योग्य पद्धतीने सुरू आहे.
_ डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री