मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे जनतेला आवाहन
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात स्थलांतरितांची संख्या वाढत आहे, तसतसे गोव्यातील गुन्हेगारीतही वाढ होत चालली आहे. सध्या सरकारी नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्यांसह सोने आणि मानवी तस्करांच्या टोळ्या कार्यरत आहेत. त्यांच्यापासून गोमंतकीय जनतेने सतर्क राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मंगळवारी पणजीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून दोघांनी गोव्यातील युवतीला मस्कतला नेले होते. गोवा पोलिसांनी मस्कतहून या युवतीची सुटका करून या प्रकरणातील दोन्ही संशयितांना अटक केली आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यात येणाऱ्या परप्रांतियांमध्ये वाढ झाली आहे. गुन्हेगारीचे प्रमाणही वाढलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या सरकारी नोकरीच्या आमिषाने लोकांना लुटणाऱ्यांच्या प्रकरणात जशा टोळ्या कार्यरत आहेत, त्याचप्रमाणे तामिळनाडू, कर्नाटकातील सोने तस्कर आणि मानवी तस्करी करणाऱ्यांच्या टोळ्याही कार्यरत आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात घोटाळे घडत आहेत. राज्यातील उद्योजक, व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेने सतर्क राहाणे अत्यंत गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत राज्यातील विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यांतील अनेक गुन्ह्यांमध्ये परप्रांतियांचा वाढता सहभाग स्पष्ट होत आहे. त्यामुळेच त्यांच्यापासून सावध राहण्याचे आवाहन करत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दोन महिन्यांपासून सक्तीने भाडेकरू पडताळणी मोहीमही राज्यभर राबवली होती.