पणजी बाजारात पालेभाज्या महागच : मटार २०० रु. किलो तर बीट १२० रु. किलो
पणजी : सप्टेंबरमध्ये लसणाचे दर ६०० रुपये किलो पर्यंत पोहोचले होते. दोन महिन्यांनी पुन्हा एकदा लसूण रडवणार आहे. सोमवारी पणजी बाजारात लसणाचे दर आकारानुसार ५५० ते ६०० रुपये किलो झाले होते. तर आल्याचे दर २० रुपयांनी वाढून १८० रुपये किलो झाले. रोजच्या स्वयंपाकात आवश्यक असणाऱ्या नारळाचे दर देखील वाढले आहेत. बाजारात लहान आकाराचा नारळ ३० तर मोठा नारळ ५० रुपयाला एक होता.
सोमवारी पणजी बाजारात मटारचे दर २०० रुपये किलो होते. बीटाचे दर ६० रुपयांनी वाढून १२० रुपये किलो झाले. गाजराचे दर मागील आठवड्याप्रमाणे १२० रुपये किलो होते. तर कोबीचे दर देखील ६० रू किलो होते. कांद्याचे दर २० रुपयांनी कमी होऊन ६० रुपये किलो झाले. वालपापडीचे दर कमी होऊन १२० रु. किलो झाले. बटाटे आणि टोमॅटोचे दर मागील आठवड्याएवढेच म्हणजे प्रत्येकी ५० रुपये किलो होते.
सोमवारी पणजी बाजारात पालेभाजी महागच होती. मेथीची एक जुडी ३० रु. , पालक, तांबडी भाजी आणि कांदा पात प्रत्येकी १५ रुपये जुडी होते. शेपू २५ रुपये तर कोथिंबीर २० रुपयाला एक जुडी होती. फ्लावरचा एका नग ६० रुपये होता. कणसे ५० रुपये ३ नग होती. भेंडी, वांगी, गवार, कारले प्रत्येकी ८० रुपये किलो होते. मध्यम आकाराचे ३ लिंबू २० रुपयांना विकले जात होते. पणजी बाजारात काकडी ४० रुपये किलो होती. दुधी भोपळा ५० रुपये किलो होता. ढब्बू मिरची १०० रु. तर हिरवी मिरची १२० रुपये किलो होती. शेवगा १६० रुपये किलो होता.
फलोत्पादन गाड्यावरील दर
फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर कांदा ४७ रु., बटाटा ४३ रू., टोमॅटो ३५ रु., वालपापडी ५४ रु. , मिरची ४० रु., भेंडी ५० रु. , गाजर ८९ रु. तर कोबी ४९ रुपये प्रती किलो दराने विकले जात होते. फ्लावरच्या एका नगाचा दर ५० रुपये होता.