गुन्हा दाखल करण्यासाठी पीडितांचा पोलीस स्थानकासमोर रात्री उशिरापर्यंत ठिय्या
कुडचडे पोलीस स्थानकासमोर बसलेले ज्येष्ठ नागरिक व त्यांचे नातेवाईक.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
सांगे : राष्ट्रीयीकृत बँकेच्या कुडचडेतील कर्मचाऱ्याकडून ज्येष्ठ नागरिकांना कोट्यवधींचा चुना लावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पीडित ज्येष्ठ नागरिक व त्यांचे नातेवाईक कुडचडे पोलीस स्थानकासमोर रात्री उशिरापर्यंत बसले होते.
ज्येष्ठ नागरिकांना बँकिंग व्यवहारांची सेवा देण्यासाठी नेमलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली आहे. तिने पीडित ज्येष्ठ महिलांचा विश्वास संपादन करून त्यांचे मोबाईल सीमकार्ड मिळविले. त्यानंतर त्यांच्या मुदत ठेवींमधून लाखोंची रोख रक्कम काढली. तसेच त्यांच्या बँक लॉकरमधून सोन्याचे दागिनेदेखील चोरले.
या प्रकरणी महिलेच्या विरोधात कुडचडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी सुरुवातीस तक्रार नोंदवण्यास दिरंगाई केल्याबद्दल स्थानिकांनी संताप व्यक्त केला. कारवाई होत नसल्याने हताश झालेल्या रहिवाशांनी मंगळवारी पोलीस ठाण्यावर धडक दिली.
आदित्य देसाई या स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेची जबाबदारी सोपवलेल्या या महिलेने त्यांच्या विश्वासाचा आणि असुरक्षिततेचा गैरफायदा घेतला आहे. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी तत्परतेने काम केले पाहिजे.
दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.