गोमेकॉत नव्या वर्षात कार्यान्वित होणार अत्याधुनिक सुविधा
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : नाकाद्वारे मेंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी गोमेकॉत नव्या वर्षाच्या सुरुवातीला अत्याधुनिक सुविधा सुरू होईल. मेंदूच्या खाली ट्युमर झाल्यास शस्त्रक्रिया करणे पूर्वी शक्य नव्हते. आता अत्याधुनिक तंत्रमानामुळे ही शस्त्रक्रिया शक्य झाली आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रियेसाठी १० लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र गोमेकॉत ती मोफत केली जाईल, असे गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले.
या शस्त्रक्रियेविषयी गोमेकॉच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. आमिन कासिम यांनी शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवले. कार्यशाळेनंतर डॉ. बांदेकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी डॉ. कासिम, इएनटी सर्जन डॉ. निशीत शहा, डॉ. पोनराज सुंदरम आदी उपस्थित होते.
अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी गोमेकॉ सुपर स्पेशलिटी विभागात विशेष केंद्र उभारले जाईल. या केंद्रातील अत्याधुनिक मशिनरीसाठी सुमारे १० कोटींचा खर्च येणार आहे, अशे डॉ. बांदेकर यांनी सांगितले.
मेंदूखालील ट्युमरची शस्त्रक्रिया कवटीखालून करणे शक्य होत नाही. अशा शस्त्रक्रिया नाकावाटे करणे तुलनेने सोपे होते, असे डॉ. पोनराज सुंदरम यांनी सांगितले.
गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेचे डॉक्टरांना प्रशिक्षण देणार
ईएनटी आणि न्यूरो सर्जरी हे दोन विभाग एकत्र येऊन गोमेकॉत शस्त्रक्रियेसाठीचे अत्याधुनिक केंद्र उभारतील. प्राथमिक टप्प्याला या विषयात कौशल्य मिळवण्याचा आमचा प्रयत्न असेल. गोमेकॉतील शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना याविषयी प्रशिक्षण देण्यासाठी बाहेरील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येणार आहे, असेही डॉ. सुंदरम यांनी सांगितले.