एसआयटीची कारवाई : संशयिताला केली ३५ महिलांनी मदत; गोठवलेल्या खात्यात तब्बल १.३६ कोटींची रक्कम
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : खून, तसेच जमीन हडप प्रकरणात अनेक गुन्हे नोंद असलेला आणि सध्या शिक्षा भोगत असलेला सिद्दिकी उर्फ सुलेमान खान (५४, रा. म्हापसा) वापरत असलेले एका महिलेचे बँक खाते एसआयटीने गोठवले आहे. या खात्यात १.३६ कोटी रुपये होते. सिद्दिकीवर देशभरात एकूण १५ वेगवेगळे गुन्हे नोंद आहेत. त्याने ३५ महिलांची मदत घेतली असून चौकशीअंती सर्व संशयितांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता. सोबत इतर. (उमेश झर्मेकर)
पणजी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चार वर्षांपासून फरार असलेल्या संशयित सिद्दिकी (सुलेमान) खान याला १२ नोव्हेंबर रोजी एसआयटीने हुबळीमधून अटक केली होती. त्याच्यावर जमीन हडप, खून, खुनी हल्ला व फसवणूक यांसारखे देशभरात एकूण १५ गुन्हे नोंद आहेत. गोव्यात ७, दिल्ली १, हैदराबाद ४ व पुणे येथे ३ गुन्हे दाखल आहेत. एकतानगर म्हापसा येथील १, गवळीमळ तिसवाडी येथील ३ व थिवी येथील २, अशा एकूण सहा मालमत्ता त्याने हडप केल्या आहेत. याशिवाय आणखी चार मालमत्तांची नावे त्याने उघड केली आहेत. म्हापसा, बेळगाव यांसारख्या ठिकाणी त्याने जमीन खरेदी-विक्री व्यवहारांत लोकांची फसवणूक केली आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.
सिद्दिकी खान याच्या नावे सात बँक खाती आहेत. त्यात किरकोळ रक्कम होती. तो सध्या वापरत असलेल्या एका महिलेच्या बँक खात्यात १.३६ कोटी रुपये होते. हे खाते गोठवण्यात आले आहे. सिद्दिकी मध्यवयीन महिलांशी मैत्री करत होता. विश्वासात घेऊन त्यांच्या बँक खात्यामधून तो आर्थिक व्यवहार करत होता. गोव्यासह दिल्ली, हैदराबाद, हुबळी, धारवाड, पुणे आदी भागातील एकूण ३५ महिलांची त्याने गुन्हे करण्यात मदत घेतली आहे. या महिलांसह त्याच्या इतर साथीदारांची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल. सिद्दिकीकडे बोगस वाहन चालक परवाना आणि पॅन कार्ड सापडले असून ही कागदपत्रे त्याने कुठून मिळवली, याचा तपास सुरू आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.
पोलीस उपअधीक्षक शिवराम वायंगणकर, निरीक्षक नितीन हळर्णकर, उपनिरीक्षक प्रीतेश मडगावकर, योगेंद्र गारुडी व योगेश गडकर यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी पोलिसांनी संशयिताला गजाआड करण्याची कामगिरी बजावली, अशी माहिती गुप्ता यांनी दिली.
गवंडीचा बनला प्रॉपर्टी डिलर
सिद्धिकीचे पालक मूळचे शिमोग्गा (कर्नाटक) येथील असून त्याचा जन्म म्हापशात झाला. सुरुवातीला तो गवंडी काम करायचा. नंतर कंत्राटदार व प्रॉपर्टी डीलर बनला. बनावट मुखत्यारपत्र करून मालमत्तेचे विक्रीपत्र बनवणे, एकच जमीन वेगवेगळ्या लोकांना विकणे, असे फसवेगिरीचे प्रकार त्याने सुरू केले होते. २००४ पासून तो फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभागी आहे.
खून, जमीन हडपमध्ये पारंगत सिद्दिकीचे कारनामे...
१. हणजूण येथील लुईझा व तेरशेला फर्नांडिस यांच्यासोबत त्याने मालमत्ता विक्रीचा ७७ लाखांचा व्यवहार केला होता. त्याने १२ लाख रुपये आगाऊ घेतले होते. हा व्यवहार फसल्याने त्याने दोघींवर खुनी हल्ला केला. त्यात लुईझा हिचा मृत्यू झाला होता.
२. म्हापशातील अॅड. ज्ञानेश्वर कळंगुटकर यांच्यावरही त्याने विषारी इंजेक्शनचा प्रयोग केला होता. ‘४० लाख रुपये कर्जाची रक्कम परत न केल्याने कळंगुटकर यांनी आपल्यावर हल्ला केला’, असा दावा त्याने पोलीस चौकशीवेळी केला होता.
३. २०१८ मध्ये हैद्राबाद येथे जुन्या नोटा बदलण्याच्या व्यवहारात पोलिसांनी सिद्दिकीला अटक केली होती.