राज्यपाल पिल्लई यांच्यासह मुख्यमंत्र्यांनीही घेतले दर्शन
पणजी : दर दहा वर्षांनी होणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेष दर्शन सोहळ्याला गुरुवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. सेंट झेवियर यांचे अवशेष ५ जानेवारी २०२५ पर्यंत जुने गोवा येथील सी कॅथेड्रलच्या आवारात ठेवण्यात येणार आहे. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्यासह अनेकांनी सेंट झेवियर यांचे दर्शन घेतले.
दिल्लीचे आर्चबिशप अनिल कुटो, आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव यांच्यासह अनेक आर्चबिशप यावेळी उपस्थित होते. मासनंतर सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे शरीर बॅसिलिका चर्च ते सी कॅथेड्रल चर्च पर्यंत बँड आणि संगीताच्या साथीने नेण्यात आले.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या दर्शन सोहळ्यासाठी इतर राज्यांसह परदेशातून भाविक येत असतात. भाविकांच्या निवासाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या वर्षी प्रथमच अशा प्रकारची निवास व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या उत्सवासाठी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांना खास निमंत्रित करण्यात आले आहे. २७ डिसेंबर रोजी ‘लाईट अँड म्युझिक शो’ होणार आहे. जे या वर्षीच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल.
दर्शनसाठी येणाऱ्या भाविकांची विशेष सोय
पुढील ४५ दिवस देश-विदेशातील लाखो पर्यटक आणि भाविक सेंट झेवियर यांचे दर्शन घेतील. भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, विश्रांती कक्ष, दिशादर्शक चिन्हे आणि पार्किंगमधून चर्चपर्यंत जाण्यासाठी विशेष वाहने (बोगी) यांची व्यवस्था करण्यात आली आहे.