फोंडा : भोमा येथील राष्ट्रीय महामार्गांवर गुरुवारी रात्री कारने स्कुटरला धडक दिल्याने स्कूटरचालक रायू धुरी (७५, चोडण) मागे बसलेली मंदाकिनी धुरी (६६, चोडण) ही दोघे जखमी झाली. या घटनेनंतर त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले. म्हार्दोळ पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.
प्राप्त माहितीनुसार गुरुवारी रात्री जीए- ०७-एए- ५५९२ क्रमांकाची स्कुटर म्हार्दोळहुन पणजीच्या दिशेने जात होती. स्कुटर मागून आलेल्या जीए - ०५- एफ -४७७७ क्रमांकाच्या कारची धडक बसल्याने स्कुटर वरील दोघेही जण रस्त्यावर कोसळले. जखमींना तत्काळ गोमेकॉत दाखल करण्यात आले. किरकोळ जखमी झालेल्या रायू धुरी याला उपचारांती घरी पाठविण्यात आले. तर मंदाकिनी धुरी यांच्यावर उपचार सुरु आहेत. निरीक्षक योगेश सावंत या प्रकरणी तपास करीत आहे.