दोन वर्षांत १६ हजार रेशनकार्ड खात्याकडे जमा

चांगले वार्षिक उत्पन्न असलेल्यांना रेशनकार्ड जमा करण्याच्या सूचना

Story: समीप नार्वेकर |
20th November, 09:40 am
दोन वर्षांत १६ हजार रेशनकार्ड खात्याकडे जमा

पणजी : राज्यात सुमारे दोन वर्षांत १६ हजार रेशनकार्ड नागरी पुरवठा खात्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. यापैकी १२ हजार दारिद्र्यरेषेवरील कार्ड आहेत, तर ३,५०० कार्ड ही दारिद्र्यरेषेखालील आहेत. दरम्यान, नागरी पुरवठा खात्याने चांगले उत्पन्न असलेल्या सर्वांना रेशनकार्ड सरेंडर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांनी, तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनी रेशनकार्ड जमा करण्याचा आदेश जारी केला आहे. याशिवाय, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना त्यांची अंत्योदय अन्न योजना (एएवाय) आणि प्राधान्य घरगुती कार्ड (पीएचएच) ही दारिद्र्यरेषेखालील कार्ड जमा करून दारिद्र्यरेषेवरील कार्डसाठी अर्ज करण्यास सांगितले होते. सदर कार्ड जमा न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा खात्याने दिला आहे.

ही कार्ड ऑनलाइन किंवा खात्याच्या तालुकास्तरीय कार्यालयात जाऊन फॉर्म डी भरून ती खात्याकडे पुन्हा जमा करा. यामध्ये जास्त वार्षिक उत्पन्न असलेले लोक, सरकारी नोकऱ्यांमध्ये नावनोंदणी करणारे आणि गोवा नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्यांनी जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान आपली १६,०४० कार्डे जमा केली. यामध्ये राज्यातील बारा तालुक्यांतील (एपीएल) कार्ड असलेल्या १२,४७९ जणांनी, पीएचएचएच कार्ड असलेल्या ३,२६९ आणि एएवाय कार्ड असलेल्या २९२ लोकांचा समावेश आहे.पेडणे तालुक्यात ४५ एएव्हाय, ७७ पीएचएच आणि ११२५ एपीएल कार्ड जमा केली आहेत.

बार्देस तालुक्यात २५ एएव्हाय, ३१२ पीएचएच आणि १५२७ एपीएल कार्ड जमा केली. डिचोली तालुक्यात १७ एएव्हाय, ८५५ पीएचएच आणि ६०९ एपीएल कार्ड जमा केली. सत्तरीत ४० एएव्हाय, २३० पीएचएच आणि २१३९ एपीएल कार्ड जमा केली. तिसवाडी तालुक्यात २१ एएव्हाय, ७० पीएचएच आणि १४९१ एपीएल कार्ड जमा केली. फोंड्यात ६१ एएव्हाय, ७१४ पीएचएच आणि १७९४ एपीएल कार्ड सरेंडर केली आहेत. मुरगाव तालुक्यात २ एएव्हाय, ७९ पीएचएच आणि ४८६ एपीएल कार्ड जमा केली.

सासष्टी तालुक्यात ० एएव्हाय, ३०७ पीएचएच आणि १०११ एपीएल कार्ड जमा केली. सांगेत ३ एएव्हाय, ६१ पीएचएच आणि ५१७ एपीएल कार्ड सरेंडर केली. केपेत ५० एएव्हाय, २८७ पीएचएच आणि ७७१ एपीएल कार्ड जमा केली. काणकोणात २१ एएव्हाय, १८४ पीएचएच आणि ७१२ एपीएल कार्ड जमा केली आहेत. धारबांदोडा तालुक्यांत ७ एएव्हाय, ९३ पीएचएच आणि २९७ एपीएल कार्ड जमा केली आहेत.

जमा झालेली एकूण कार्ड : १६,०४०
एपीएल कार्ड : १२,४७९
पीएचएच कार्ड : ३,२६९
एएव्हाय कार्ड : २९२

हेही वाचा