सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधाराने पोलिसांची असणार नजर
सेंट फ्रान्सिस झेवियर पवित्र शवप्रदर्शन सोहळ्याविषयी पत्रकार परिषदेत माहिती देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत मंत्री अालेक्स सिक्वेरा, वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो, आमदार राजेश फळदेसाई, संदीप जॅकीस. (नारायण पिसुर्लेकर)
पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शन सोहळ्यादरम्यान चर्च परिसरात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधाराने पोलिसांची करडी नजर राहणार आहे. संशयास्पद हालचाली वा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास संबंधिताला ताब्यात घेऊन पोलीस कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
सेंट फ्रान्सिस झेवियर पवित्र शवप्रदर्शन सोहळा २१ नोव्हेंबर ते ५ जानेवारी २०२५ या काळात जुने गोवे चर्च परिसरात होणार आहे. सोहळ्याची ९८ टक्के तयारी पूर्ण झाली आहे. भाविक तसेच सर्वसामान्य जनतेला आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातील. सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला कायदा मंत्री अलेक्स सिक्वेरा, वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, आयोजन समितीचे संघटक संदीप जॅकीस व इतर अधिकारी उपस्थित होते.
शवप्रदर्शन सोहळ्याच्या काळात परिसरात सुरक्षेसाठी ७००, तर वाहतूक व्यवस्थापनासाठी ६०० मिळून १३०० पोलिसांची व्यवस्था आसणार आहे. पूर्ण वेळ पोलीस उपअधीक्षकांसह पोलीस निरीक्षकांची व्यवस्था केली जाईल. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, फिरती प्रसाधनगृहे, दिशादर्शक फलक, पार्किंगस्थळापासून चर्चमध्ये जाण्यासाठी खास वाहने (बोगी) अशी व्यवस्था असणार आहे. सर्व रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. रायबंदर ते जुने गोवे रस्ता बुधवारी पूर्ण होईल.
२१ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वा. प्रार्थना सभेने सोहळ्याला सुरुवात होणार आहे. उद्घाटन सोहळ्याला कोणालाही चर्चतर्फे निमंत्रण देण्यात आलेले नाही. पहिल्या प्रार्थना सभेनंतर सेंट फ्रान्सिस झेवियरचा पवित्र शवदर्शनासाठी बॅसिलिका चर्चमधून सी कॅथेड्रल चर्चमध्ये नेण्यात येईल. ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या फेस्ताला मात्र मुख्यमंत्री तसेच इतर महनीय व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती फा. हेन्री फाल्काव यांनी दिली.
भाविकांच्या निवासासाठी पिलग्रीमेज व्हीलेज
- यंदाचा शवप्रदर्शन सोहळा हा वेगळा व अायोजनदृष्ट्या सर्वोत्कृष्ट सोहळा होणार आहे. कोणत्याही प्रकारचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करणे गोव्याला शक्य आहे, हे शवप्रदर्शन सोहळ्यातून सिद्ध होणार आहे.
- शवप्रदर्शन सोहळ्यासाठी इतर राज्यांसह विदेशातूनही भाविक येतात. या भाविकांच्या निवासासाठी खास पिलग्रीमेज विलेज उभारण्यात आलेली आहे. यंदा प्रथमच अशा तऱ्हेची निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी खास व्यवस्था असणार आहे.
- लाईट अॅण्ड म्युझीक शो हे यंदाच्या सोहळ्याचे खास आकर्षण असणार आहे. सदर शो २७ डिसेंबर रोजी होणार आहे.
राज्यभरातून कदंब बशींची व्यवस्था
पणजी ते जुने गोवेपर्यंत कदंब बशींची व्यवस्था असणार आहे. याशिवाय मडगाव, फोंडा, वास्को, म्हापसा या ठिकाणाहून खास कदंब बशींची व्यवस्था केली जाणार आहे. बसव्यवस्थेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.