पणजी : सागर नाईक मुळेंचे 'द पिकॉक' घडवणार गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th November, 04:14 pm
पणजी : सागर नाईक मुळेंचे 'द पिकॉक' घडवणार गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन

मडगाव : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) निमित्ताने मनोरंजन सोसायटी ऑफ गोवातर्फे जारी करण्यात आलेल्या पुस्तिकेवरील चित्राने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. द पिकॉक या पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर गोमंतकीय कलाकार सागर नाईक मुळे यांनी हातात दीप घेतलेली महिला व तिच्या साडीच्या उडणाऱ्या पदरामुळे निर्माण झालेला मोराप्रमाणे पिसारा या चित्रातून गोव्याची संस्कृती व कला दर्शवण्यात आलेली आहे. 

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या कालावधीत इंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांच्याकडून चित्रपट महोत्सवातील विविध माहिती द पिकॉक या दरदिवशी प्रदर्शित केल्या जाणाऱ्या पुस्तिकेतून दिले जाते. यावर्षी इफ्फीच्या निमित्ताने द पिकॉक या पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर सागर नाईक मुळे यांच्या चित्राला स्थान देण्यात आलेले आहे. गोमंतकीय कलाकार सागर यांच्याकडून कावी कलेचे संवर्धन व प्रसार करण्यात येत आहे. सुमारे सहाशे वर्षे जुनी कावी कला पुनरुज्जीवित करण्याचे कार्य सागर आपल्या कलाकृतीतून करत असतात. लुप्त होणारी ही कला सागर नाईक मुळे यांनी प्रकाशझोतात आणली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमातून या कलेचे कौतुक करण्यात आल्यानंतर या कलेच्या प्रसारात भर पडली. द पिकॉकसाठी सागर यांनी काढलेल्या चित्रात त्यांनी कावी कलेच्या माध्यमांचाच वापर केला. भित्ती चित्रांचा हा फॉर्मट वापरत त्याला इफ्फी २०२४ ची बॉर्डर काढलेली आहे. कोणत्याही समारंभाची, कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्वलनाने केली जाते. त्याच धर्तीवर एक दीप हातात घेतलेल्या पारंपरिक हिंदुस्तानी पेहराव केलेलया महिलेला सुबकरीत्या चितारण्यात आले आहे. तिचा उडणारा पदर मोराच्या पिसाऱ्याप्रमाणे दाखवून त्या पदरावर मोराची चित्रे काढलेली आहेत. भिंतींवरील चित्राचा भास होण्यासाठी चित्राच्या खालील व वरील भागाचा पुरेपुर भिंतीसारखे दिसणारा भाग दाखवला आहे. 

हातात दीप घेतलेल्या महिलेची उभी राहण्याची ढबही अगदी मोराप्रमाणे दाखवून हे चित्र परिपूर्ण केलेले आहे. इफ्फीसाठी गोव्यात आलेल्या व नोंदणी केलेल्या प्रतिनिधींच्या हातात ही पुस्तिका गोव्यातील शेकडो वर्ष जुन्या कावी कलेच्या प्रसारात मोलाची भूमिका बजावत आहे. देशी परदेशी प्रतिनिधींनाही हा पिकॉक भावताना दिसत आहे.



हेही वाचा