संविधानिक पदाचा मान मंत्री, आमदारांनी राखण्याची गरज

रमेश तवडकर : नाहक टीका सहन करून घेणार नाही

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th November, 11:52 pm
संविधानिक पदाचा मान मंत्री, आमदारांनी राखण्याची गरज

 मडगावातील कार्यक्रमाचा शुभारंभ करताना सभापती रमेश तवडकर. (संतोष मिरजकर)

मडगाव : सभापतीपदावर असताना कोणावरही दुखावले जाईल, अशी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे सरकारातील प्रत्येक आमदार व मंत्र्यांनी संविधानिक पदाला मान देण्याची गरज आहे. याआधी असे तीन घटना घडल्या. मुख्यमंत्र्यांसमोर भाषण करताना मंत्र्यांनी संविधानिक पदाचा मान राखण्याची व योग्य भाषा वापरण्याची गरज आहे. याबाबतची तक्रार आपण सध्या पक्षाकडे केलेली आहे, असे मत सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केले.
मडगाव येथे बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आयोजित रॅली मंगळवारी रवींद्र भवन मडगाव येथे दाखल झाली. या कार्यक्रमानंतर सभापती तवडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, हा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. महिनाभरापासून सुरू असलेल्या रॅलीला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला. बुधवारी याचा समारोप काणकोण येथे होणार आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारे शक्तीप्रदर्शनाचा प्रश्न येत नाही. दरवर्षी लोकोत्सवात लाखो लोक येतात, गेल्यावर्षी दोन लाख लोकांची उपस्थिती होती, यावर्षी तीन लाखांवर जाईल.
प्रत्येक घरातील व्यक्तींमध्ये, पक्षांतूनही मतभेद असतात. व्यक्तिनिहाय प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या विचारानुसार कार्य करत असतात. गोविंद गावडे व रमेश तवडकर यांच्यात तात्विक मतभेद नक्कीच आहेत, हे याआधीही प्रत्येकवेळी सांगितलेले आहे. काही लोकांची मते आपणास पटत नाहीत, त्यांच्यापासून २०१२ पासून आपण फारकत घेतलेली आहे. २०१७ ते २०२२ या कालावधीत आपण अशा लोकांना सत्ता मिळताच टीका करण्याची वृत्ती पाहिली व ती सोसलेली आहे. आता पुन्हा एकदा आमदार झालेलो आहोत व आता त्यांची टीका कशासाठी सहन करून घ्यायची, असे वक्तव्यही रमेश तवडकर यांनी केले.

काही लोकांच्या सावलीला उभे राहण्याचीही आपली तयारी नाही. गोव्यात काही अराजक शक्ती वावरत आहेत. यावर वेळीच आवर न घातल्यास येणार्‍या काळात त्याचा केवळ एका समाजाला नाही तर पूर्ण गोव्याला त्रास होणार आहे. _रमेश तवडकर, सभापती

हेही वाचा