बार्देश : नोकरभरती प्रक्रियेवरून म्हापसा पालिका मंडळांच्या बैठकीत पुन्हा गदारोळ

११ नगरसेवकांचा सभात्याग. तिसऱ्यांदा बैठक तहकूब.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
18th November, 04:56 pm
बार्देश : नोकरभरती प्रक्रियेवरून म्हापसा पालिका मंडळांच्या बैठकीत पुन्हा गदारोळ

 फोटो : (उमेश झर्मेकर)

म्हापसा : नोकरभरती प्रक्रियेवरून म्हापसा पालिका मंडळांच्या बैठकीत पुन्हा सत्ताधारी आणि विरोधकांत खडाजंगी पाहण्यास मिळाली.  यादरम्यान विरोधी नगरसेवकांनी नोकर भरतीच्या फाईल्स बैठकीसमोर ठेवण्याची मागणी केली. मात्र हे  प्रकरण आता डीएमएकडे गेल्याने न्यायप्रविष्ठ असल्याची माहिती देत नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर फाईल सादर करण्याचे टाळले व यावर अधिक चर्चेसाठी नकार दिला. यामुळे २० पैकी ११ नगरसेवकांनी सभात्याग केला व ही सभा तिसऱ्यांदा तहकूब झाली. 

आज दुपारी ३ वाजता पालिका मंडळाची बैठक पार पडली. सुरुवातीला उपनगराध्यक्ष सुशांत हरमलकर यांनी सभेच्या सुरुवातीला भाडेकरू करारपत्र आणि दुकानांच्या हस्तांतरणाचा विषय बैठकीसमोर ठेवला. दरम्यान हा विषय चुकीचा असल्याचा दावा करीत  काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे हरमलकर यांनी हा विषय पुढे ढकलला. डीएमएकडून मान्यता मिळाल्यावरच हा मुद्दा पुन्हा चर्चेस घेण्याचे यावेळी ठरले.

त्यानंतर इतर विषयांच्या चर्चेवेळी नोकरभरतीचा मुद्दा शशांक नार्वेकर यांनी उपस्थित केला. तसेच तारक आरोलकर यांची नोकर भरतीची फाईल बैठकी समोर ठेवण्याची मागणी करण्यात आली. मात्र या प्रकरणी डीएमए आणि दक्षता खात्याकडे तक्रार दाखल होत प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ बनल्याचे नगराध्यक्षा  डॉ नूतन बिचोलकर आणि सांगितले व पालिका कायद्याचा हवाला देत प्रकरण चर्चेस घेण्यास नकार दिला. दरम्यान हे प्रकरण न्यायप्रविष्ठ बनत नसल्याचा दावा करीत नगरसेवकांनी नगराध्यक्षांना घेरले व त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. मात्र नगराध्यक्षा ऐकत नसल्याचे पाहून ११ नगरसेवकांनी सभात्याग केला. त्यामुळे नगराध्यक्षांना नाईलाजास्तव बैठक तिसऱ्यांदा तहकूब करावी लागली.

सभात्याग केलेले नगरसेवक :  प्रकाश भिवशेट, तारक आरोलकर, विराज फडके, शशांक नार्वेकर, कमल डिसोझा, केयल ब्रागांझा, अन्वी कोरगावकर, सुधीर कांदोळकर, आनंद भाईडकर, शुभांगी वायंगणकर व विकास आरोलकर.

हेही वाचा