आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आज उद्घाटन

जगभरातील हजारो चित्रपट रसिक गोव्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th November, 11:46 pm
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आज उद्घाटन

पणजी : ५५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन बुधवारी सायंकाळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे पुढील नऊ दिवसांत चित्रपट रसिकांना जगभरातील दर्जेदार चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे.
यंदाच्या महोत्सवात २७० पेक्षा अधिक चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय विभागात ८१ देशांतील १८० हून अधिक चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. त्यासाठी पणजी, मडगाव आणि फोंडा येथील सहा चित्रपटगृहांची निवड करण्यात आली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही पणजीतील आयनॉक्स, सम्राट अशोक, मॅकेनीझ पॅलेस, पर्वरीतील आयनॉक्स येथे चित्रपट दाखवले जाणार आहेत. तर, प्रथमच मडगाव आयनॉक्सच्या चार, तर फोंडा आयनॉक्सच्या दोन चित्रपटगृहांत इफ्फीचे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. याशिवाय वागातोर, मिरामार आणि रवींद्र भवन मडगाव येथे ओपन एअर स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, आतापर्यंत इफ्फीसाठी ६,५०​० पेक्षा प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे. महोत्सवाच्या रेड कार्पेटवर विविध भाषांतील चित्रपटांतील दिग्गज हजेरी लावणार आहेत. प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक फिलीप नॉयसी यांना सत्यजीत रे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.            

हेही वाचा