गुन्हे वार्ता : सरकारी नोकऱ्यांचे गाजर देत लोकांना गंडवणाऱ्या पूजा नाईकला अखेर जामीन मंजूर

पूजा नाईक विरोधात डिचोली, पर्वरी तसेच म्हार्दोळ पोलीस स्थानकांत फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
9 hours ago
गुन्हे वार्ता : सरकारी नोकऱ्यांचे गाजर देत लोकांना गंडवणाऱ्या पूजा नाईकला अखेर जामीन मंजूर

पणजी : गोव्यात अनेकांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या पूजा नाईकला फसवणुकीच्या सर्व प्रकरणांत जामीन मंजूर करण्यात आला आहे. तिला पणजी प्रथमवर्ग न्यायालयाने ३० हजार रुपये दंड व इतर अटींसह सशर्त जामीन मंजूर केला. 

एकंदरीत लोकांना सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवत गंडा घालण्याच्या प्रकरणांचा उलगडा सर्वप्रथम पूजा नाईकच्या प्रकरणानेच झाला होता. यानंतर तिच्या गाड्या व मालमत्ता जप्त करण्यात आल्या व चौकशी सुरू झाली. पूजा नाईक विरोधात डिचोली, पर्वरी तसेच म्हार्दोळ पोलीस स्थानकांत फसवणुकीचे अनेक गुन्हे नोंद आहेत.  प्राप्त माहितीनुसार सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घालणारी पूजा नाईक ऊर्फ रूपा पालकर ही २०१२-१३ मध्ये राज्यातील एका प्रादेशिक पक्षाच्या पणजीतील कार्यालयात कार्यरत होती. तेथील ओळखीचा फायदा घेऊन तिने त्या काळात दहा जणांना सरकारी नोकरी दिल्याचीही धक्कादायक माहिती अलीकडेच समोर आली होती. 

२०१२ ते २०२४ या बारा वर्षांच्या काळात संशयित पूजा नाईक हिने सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवत अनेकांना सुमारे दोन कोटींचा गंडा घातल्याचा अंदाज आहे. सरकारी नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून लोकांना कोट्यवधींना गंडा घालण्याच्या प्रकरणात पूजा नाईक हिला यापूर्वी म्हार्दोळ, डिचोली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तिला पर्वरी पोलिसांनी अटक केली आहे. पूजा नाईक हिच्या प्रकरणात संशयित असलेल्या श्रीधर सतरकर याने काही दिवसांपूर्वी कुंकळ्ये-म्हार्दोळ परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले होते. सतरकर याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत म्हार्दोळ पोलिसांनी पूजाविरोधात गुन्हा दाखल केला होता. 

याशिवाय म्हार्दोळ पोलिसांनी पूजाच्या घरावर छापा टाकून सरकारी नोकरी संदर्भातील सुमारे ५० जणांचे अर्ज जप्त केले आहेत. पूजा नाईक हिने एका तक्रारदाराच्या मुलाला वाहतूक खात्यात कनिष्ठ लिपिकाची नोकरी देण्याच्या बहाण्याने चार लाख रुपये उकळले होते. दुसऱ्या मुलाला सार्वजनिक बांधकाम खात्यात (पीडब्ल्यूडी) अभियंत्याची नोकरी देण्याचे आमिष दाखवून दहा लाख रुपये घेतले होते. या तक्रारीची दखल घेऊन म्हार्दोळ पोलिसांनी पूजा हिच्या विरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली होती. 


हेही वाचा