बेवारस दोन ट्रकांमध्ये सापडली १.३५ कोटींची महाराष्ट्राची दारू

सांकवाळ औद्योगिक वसाहतीत अबकारी विभागाकडून दारू जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15 hours ago
बेवारस दोन ट्रकांमध्ये सापडली १.३५ कोटींची महाराष्ट्राची दारू

 सांकवाळ येथे ताब्यात घेतलेल्या ट्रकसह पोलीस अधिकारी व शिपाई. (अक्षंदा राणे)

वास्को : सांकवाळ औद्योगिक वसाहतीमध्ये दोन बेवारसस्थितीत उभे असलेल्या दोन मोठ्या ट्रकांतील सुमारे १ कोटी ३५ लाख रुपयांची महाराष्ट्रमेड दारूच्या बाटल्या अबकारी खात्याच्या वास्को विभागाने ताब्यात घेतल्या. यापूर्वी गोवामेड दारूच्या बाटल्या इतर राज्यांमध्ये नेण्याचे प्रकार घडत होते. परंतु, इतर राज्यांतून गोव्यात दारूच्या बाटल्या आणणे हा प्रकार प्रथमच घडत आहे. याप्रकरणी वास्को विभागाला संबंधित ट्रकांविषयी व इतर माहिती मिळाली असून तपास सुरू आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात गोव्यात या दारूच्या बाटल्या कोणत्या कारणासाठी आणण्यात आल्या होत्या. यासंबंधी चौकशी चालू आहे. दोन्ही ट्रकांना चाव्या नसल्याने त्यातील जप्त करण्यात आलेली दारूची खोकी अबकारी खात्याने आपल्या स्थळी नेली आहेत. या कारवाईबद्दल स्थानिक घाऊक मद्यविक्रेत्यांनी समाधान व्यक्त करून अबकारी खात्याच्या पथकाचे अभिनंदन केले. सदर कारवाई अबकारी खात्याचे सहाय्यक आयुक्त व अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को विभागाचे निरीक्षक शांबा नाईक, रमीझ मुल्ला, नदीम बेग, शिपाई संदेश शेटकर, दुर्गाप्पा मदार, शबीर शेख, उदय नाईक, शुभम शिरोडकर, कुणाल नाईक, रश्वेश गावडे, सिद्धेश गोवेकर, चेतन खवणेकर यांनी केली.
दरम्यान, सदर दारू महाराष्ट्रातून आणून कोठे पाठविण्यात येत होती, याचा शोध घेतला जात आहे. या ट्रकांचे चालक हाती लागल्यावर एकंदर घटनेवर प्रकाश पडण्याची शक्यता आहे. अबकारी खात्याच्या वास्को विभागाला काही माहिती मिळाली असून शहानिशा केली जात आहे.
ट्रकांसह १ कोटी ८४ लाख रुपयांचा माल जप्त
या ट्रकांमध्ये रॉयल स्टॅगच्या १८० एमएल व व्हिस्की १८० एमएलच्या बाटल्या होत्या. एका ट्रकमध्ये १४०० खोकी मिळाली. त्यांची किंमत ७० लाख ८ हजार, तर दुसऱ्या ट्रकात १२०० खोकी आढळून आली. त्यांची किंमत ६४ लाख ८० हजार रुपये होती. तसेच दोन्ही ट्रकांची किंमत अंदाजे ५० लाख रुपये असल्याचे मानले जात असून वास्को अबकारी विभागाने सुमारे १ कोटी ८४ लाख रुपयांचा माल पकडला आहे.