तीन दुचाकींसह आठ लाखांचे नुकसान
हरमल-देऊळवाडा येथील गॅरेजला लागलेली आग.
हरमल : मधलावाडा श्री महापुरुष देवस्थाननजीक दुचाकी गॅरेजीस शॉर्टसर्किटमुळे आग लागून तीन दुचाकी वाहनांसह अंदाजे आठ लाखांचे नुकसान झाले. पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले.
मंगळवारी दुपारी ३च्या सुमारास गॅरेज चालक हरमिंदर सिंग, गॅरेज बंद करून जेवणासाठी गेले होते. त्यावेळी गॅरेजमध्ये तीन दुचाकी अॅक्टिवा, एफ झी व मेसट्रो तसेच वाहनाचे काही सुटे भाग, ऑईल व अन्य सामग्री होती. आगीने पेट घेतल्यानंतर लहान तीन-चार स्फोट झाले व गॅरेजमधील सामान ठेवण्याचे स्टँड, मोटर पंप, इलेक्ट्रिक बोर्डने पेट घेतला. गॅरेजच्या भिंतीला दहा-बारा ठिकाणी तडे गेले असून आतील सिमेंट पूर्णपणे तुटून कोसळले. आग लागताच, मालक महेंद्र तसेच मिथुन व मोहन इब्रामपुरकर आदींनी पंप सुरू करून आग आटोक्यात आणण्यासाठी धावपळ केली. तत्पूर्वी संपूर्ण गॅरेज जळून खाक झाले होते.
यावेळी पेडणे अग्निशमन दलाचे जवान विठ्ठल परब, मस्करेन्हास, शेखर मयेकर, मयूर नाईक, यशवंत नाईक आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान, हरमल भागातील गेल्या महिनाभरातील ही दुसरी घटना असून, मांद्रे मतदारसंघात मिनी अग्निशमन दल कार्यान्वित करण्याची मागणी केली जात आहे. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी याकडे लक्ष द्यावा, असे मत स्थानिक मोहन इब्रामपूरकर यांनी व्यक्त केले आहे.