म्हापसा पालिका कर्मचाऱ्याचा समावेश : फिर्यादी, पीडितांना ३८.४९ लाखांचा गंडा
म्हापसा : कुचेली कोमुनिदादच्या मालकीच्या खडपावाडा येथील जागेत भूखंड पाडून परस्पररीत्या विक्री करून निरपराध लोकांची फसवणूक करणे व ही मालमत्ता कायदेशीर करण्याचे आमिष दाखवून ३८.४९ लाख रुपये उकळल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला. या प्रकरणी पालिका कर्मचारी संशयित रमेश राव (कुचेली, म्हापसा) व शकील शेख (करासवाडा, म्हापसा) या दोघांना अटक केली आहे.
म्हापसा पोलिसांनी बुधवारी (२० रोजी) ही कारवाई केली. हा फसवणुकीचा प्रकार दि. १ जानेवारी २०१८ ते १५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडला. फिर्यादी सुश्मिता दामोदर हरमलकर (रा. फ्रेतसवाडा, वेर्ला काणका) व इतर सहा-सात जणांनी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी संशयितांविरुद्ध पोलिसांनी भादंसंच्या ६१(२)(अ), ३१६, ३१८, १११(३) व ३(५) कलमांन्वये गुन्हा नोंद केला आहे.
सरकारने म्हापसा शहर पीटी शीट क्र. १, चलता क्र. १०/३ व पीटी शीट क्र. २, चलता क्र. ११/१ मधील एकूण ३० हजार १८७ चौ. मी. ही कुचेली कोमुनिदादच्या मालकीची खडपावाडा येथील जमीन स्मशानभूमीसाठी संपादित केली होती. या जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीररीत्या ३६ घरे उभारली होती. या घरांना उपजिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटाव नोटीस बजावत ती १२ नोव्हेंबरला जमीनदोस्त केली होती.
या कारवाईमुळे फिर्यादी व पीडितांनी म्हापसा पोलिसांत धाव घेत वरील संशयितांविरुद्ध तक्रार दिली होती. संशयितांनी त्यांच्या सामूहिक हेतूने गुन्हेगारी कट रचला व स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी व इतर निरपराध व्यक्तींना कुचेली कोमुनिदाद जागेतील भूखंड विकत घेण्यास प्रवृत्त केले. संशयितांनी कोमुनिदाद भूखंडाचे आमिष दाखवून तक्रारदार व इतर निष्पाप व्यक्तींकडे आर्थिक व्यवहार केला. संशयितांनी वरील भूखंडाचे हक्क फिर्यादींच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी कायदेशीर औपचारिकता पूर्ण केली जाईल, अशी हमी दिली होती. यासाठी संशयितांनी पीडितांकडून संगनमताने ३८ लाख ४९ हजार रुपये उकळले. आपली घरे कायदेशीर होतील, या आशेवर पीडित अवलंबून होते. तसेच संशयित वेळोवेळी त्यांना आश्वासने देत होते. मात्र, सरकारच्या कारवाईनंतर आपली फसवणूक झाल्याचे समजताच फिर्यादींनी पोलिसांत रितसर तक्रार केली.
दरम्यान, वरील पीटी शीट व चलता क्र.तील अजून १.४४ चौ.मी. कुचेली कोमुनिदादच्या जागेवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण झाले आहे. या जमिनीत जवळपास १५० घरे उभारली आहेत. या बेकायदा बांधकामांनाही उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासक पांडुरंग गाड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधितांना पंधरा दिवसांत आपले म्हणणे सादर करण्याची वेळ देण्यात आली आहे. ही जागा देखील वरील संशयितांनी अवैधरीत्या संबंधितांना विकली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
संशयितांविरुद्ध म्हापसा पोलिसांत गुन्हा नोंद
संशयित राजू मांद्रेकर (रा. तीन माड, कामुर्ली), राजा अँथनी (रा. करासवाडा), रमेश राव (रा. कुचेली), शकील शेख (रा. करासवाडा), नॉबर्ट (कुचेली कोमुनिदाद सदस्य), रवी (कुचेली कोमुनिदाद सदस्य) व इतरांविरुद्ध पोलिसांनी हा गुन्हा नोंद केला आहे. अटक केलेला संशयित आरोपी रमेश राव हा म्हापसा पालिकेत पर्यवेक्षक म्हणून कामाला आहे.