भूखंड देण्याच्या बहाण्याने दिव्यांग युवतीची फसवणूक

मडगावातील प्रकरण : न्याय मिळवून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे तक्रारदाराला आश्वासन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15 hours ago
भूखंड देण्याच्या बहाण्याने दिव्यांग युवतीची फसवणूक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोलताना मुनीरुद्दीन व सुमेरा खान.

साखळी : पर्वरी हाऊसिंगबोर्ड येथे भूखंड देण्याचे आमिष दाखवून मडगाव येथील मुनीरूद्दीन खान व त्यांची दृष्टिहीन मुलगी सुमेरा खान यांना ८ लाख रुपयांना फसविल्याची तक्रार मडगाव टाऊन पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. या संदर्भात तक्रारदार मुनीरूद्दीन खान व सुमेरा खान यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची साखळीत भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष घालताना सदर अंध मुलीला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन दिले.
हा फसवणुकीचा प्रकार गेल्या २०२० साली घडला होता. मडगाव येथील एसी मेकॅनिक सिराजुद्दीन खान हा आपल्याकडे आला व त्याने संशयित सादीक शेख हा पर्वरी येथे हाऊसिंगबोर्डचा भ‍ूखंड विकत देऊ शकतो. शक्य असल्यास आपण घेऊ शकता, असे सांगितले. परंतु, त्यावेळी आपण त्याकडे जास्त लक्ष दिला नाही. तरीही सिराज याने आपणास इंटरनेटवर भूखंडांचे फोटो दाखविले. त्यामुळे आपण सदर भूखंड पाहण्यास तयार झालो. या व्यवहारात त्याने मुख्य संशयित सादीक शेख याच्याशी आपली ओळख करून दिली. सादीकने आपल्या व्हॅगनार या कारमधून आपणास पर्वरी येथे गाडीतूनच भूखंड दाखविला व लागलीच या भूखंडासाठी करारपत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली, असे तक्रारदार मुनीरुद्दीन खान याने सांगितले.
या जमीन व्यवहार प्रकरणी सादीकने आपणाकडून ४.५ लाख रुपये घेतले. आपली मुलगी दृष्टिहीन आहे. त्यामुळे तिला ‘डिसेबल’ या निकषावर कमी किमतीत भूखंड मिळू शकतो, असे सांगून सुमेरा हिच्या नावावर रु. ३.५ लाख घेतले. दरम्यान, चौकशीनंतर त्याने अनेकांना अशाच प्रकरणांतून टोपी घातल्याचे लक्षात आले. याबाबत मडगाव टाऊन पोलीस स्थानकात पोलीस तक्रार नोंदवल्याचे मुनीरुद्दीन व सुमेरा खान यांनी सांगितले.
सदर तक्रार केल्यानंतर मुनीरुद्दीन व सुमेरा खान यांनी बुधवारी सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची त्यांच्या साखळीतील निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात आपण लक्ष घालून सखोल चौकशी करणार व सदर बाप-लेकीला न्याय मिळवून देणार, असे सांगितले.
बनावट कागदपत्रांसह केला पैशांचा व्यवहार
सदर करार करताना बनावट कागदपत्रे सादर करून तसेच हाऊसिंगबोर्ड महामंडळाचा बनावट शिक्का (स्टेम्प) मारून करार केला. सदर कागदपत्रे व शिक्का पाहिल्यानंतर आम्हाला त्याच्यावर विश्वास बसला. या विश्वासानेच आम्ही त्याच्याशी पैशांचाही व्यवहार केला. परंतु, आमच्याकडून ८ लाख रु. घेऊन सादीक पसार झाला. त्यानंतर त्याचा संपर्कच होत नव्हता. तसेच सदर भूखंडही मिळाला नाही, शिवाय पैसेही मिळाले नसल्याचे तक्रारदाराने सांगितले.