पणजी : धारगळ-पेडणे येथे आयोजित करण्यात येणाऱ्या सनबर्न इलेक्ट्रॅानिक म्युझिक फेस्टिव्हलला विरोध करून गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर बुधवार, दि. २० रोजी सुनावणी होणार आहे.
भरत बागकर यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी राज्य सरकार, पर्यटन संचालक, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य सचिव, गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण सदस्य सचिव, पेडणे उपजिल्हाधिकारी, पेडणे उपविभागीय पोलीस अधिकारी, पेडणे पोलीस निरीक्षक, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, जलस्रोत खाते, धारगळ सरपंच व सचिव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्पेसबाऊंड वेब लॅब प्रा. लि. यांना प्रतिवादी केले आहे. त्यानुसार, स्पेसबाऊंड वेब लॅब प्रा. लि. या कंपनीने १२ नोव्हेंबर रोजी धारगळ येथे दि. २८ ते ३० डिसेंबर दरम्यान सनबर्न संगीत महोत्सव आयोजित करण्याचे जाहीर केले आहे. याला याचिकादाराने विरोध करून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी धारगळमध्ये नियोजित केलेली सनबर्नची जागा राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याशिवाय धारगळ गाव एक पारंपरिक मूळ गाव आहे. गावात पायाभूत सुविधांच्या विकास होत असून हा विकास राज्याच्या सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकासासाठी योगदान देणारा अाहे. सनबर्नच्या घोषणेमुळे, धारगळ गावात दारू तसेच इतर प्रतिबंधित पदार्थांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
सनबर्न इलेक्ट्रॅानिक म्युझिक फेस्टिव्हलमुळे गावात अनियंत्रित ध्वनी आणि प्रकाश प्रदूषण होण्याची भीती याचिकादाराने व्यक्त केली आहे. गावावर त्याचा वाईट परिणाम होणार असल्याचा दावा करुन सनबर्न आयोजित करण्यात देऊ नये, अशी मागणी केली आहे.
सनबर्नची तिकीट विक्री बंदचा आदेश द्यावा!
याचिकेचा निकाल लागेपर्यंत आयोजकांना सनबर्नची तिकीट विक्री बंद ठेवण्याचा आदेश देण्याची मागणी केली आहे. तसेच इतर मुद्दे याचिकेत मांडण्यात आले आहेत.