काही तास व्यवस्था न केल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त
पणजी : गोवा ते लखनऊ या इंडिगो कंपनीच्या ६ इ, ६८११ या विमानाने मंगळवारी सायंकाळी ६.३५ वाजता दाबोळी विमानतळावरून उड्डाण घेतले. परंतु, विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काहीच वेळात विमान पुन्हा विमानतळावर उतरवण्यात आले. प्रवाशांना विमानातून खाली उतरविण्यात आल्यानंतर कंपनीकडून काही तास पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे काही प्रवाशांनी विमानतळावर संताप व्यक्त केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा-लखनऊ विमानाने सायंकाळी ६.३५ वाजता विमानतळावरून उड्डाण घेतले. त्यानंतर वीस मिनिटांनी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले आणि विमान पुन्हा दाबोळी विमानतळावर उतरवण्यात आले. त्यानंतर प्रवाशांना खाली उतरवून बॅगा ताब्यात घेण्यास सांगण्यात आले. परंतु, काही तास प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ९.१५ वाजण्याच्या सुमारास विमानाची दुरुस्ती केल्याचे सांगून प्रवाशांना पुन्हा बोर्डिंग पास घेण्याच्या सूचना करण्यात आल्या, असेही सूत्रांनी सांगितले.
इंडिगो कंपनीच्या गोवा-लखनऊ विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते पुन्हा दाबोळी विमानतळावर उतरवण्यात आले. विमानातील तांत्रिक बिघाड दूर करण्यात आल्यानंतर विमान पुन्हा उड्डाणासाठी सज्ज झाले, असे विमानतळ संचालक एस. व्ही. टी. धनमंजन राव यांनी सांगितले.