ड्रग्जप्रकरणी पोलिसांविरुद्ध पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश

आरोप निश्चित करण्याचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
12 hours ago
ड्रग्जप्रकरणी पोलिसांविरुद्ध पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश

पणजी : उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने ड्रग्ज तस्करीप्रकरणी इस्रायली नागरिक डेव्हीड डिहम ऊर्फ डुडू याला निर्दोष मुक्त केले होते, तर तत्कालीन सात पोलीस कर्मचाऱ्यांवर आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला होता. या प्रकरणातील पोलीस कर्मचाऱ्यांवर भारतीय दंड संहितेअंतर्गत कारवाई होऊ शकते. मात्र अमली पदार्थविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई होत नाही, असे निवेदन केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्यावतीने (सीबीआय) गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आले. याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने वरील आरोप निश्चित करण्याचा आदेश रद्द करून पुन्हा सुनावणी घेण्याचा निर्देश सत्र न्यायालयाला जारी केला. याबाबतचा आदेश न्या. भरत देशपांडे यांनी दिला आहे.
डुडूच्या अटकेनंतर राज्यात खळबळ माजली होती. यात पोलीस अधिकाऱ्यांसह मंत्र्यांच्या नातेवाईकांवरही आरोप झाले होते. त्याचवेळी डुडूने आपल्या विरोधात ‘एएनसी’ने खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा केला होता. त्यानंतर काँग्रेस नेते सुनील कवठणकर यांच्यासह तिघांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून या प्रकरणात राजकारणी, पोलीस आणि ड्रग्ज तस्करांमध्ये साटेलोटे असल्याचा दावा केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआय वर्ग केले. न्यायालयाने १ जून २०११ रोजी डुडूविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला. याच दरम्यान सीबीआयने पुरवणी आरोपपत्र दाखल करून डुडूचे ड्रग्ज प्रकरण बनावट असल्याचे नमूद केले. तसेच छाप्यात सहभागी असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांविरोधात षडयंत्र रचणे, बनावट गुन्हा दाखल करणे, न्यायालयाची दिशाभूल करणे यांसह इतर आरोप करत सात पोलीस कर्मचाऱ्यांची नावे पुरवणी आरोपपत्रात नमूद केली. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी घेऊन इस्रायली नागरिक डेव्हीड डिहम ऊर्फ डुडू याला निर्दोष मुक्त केले, तर तत्कालीन पोलीस उपअधीक्षक नरेश म्हामल, उपनिरीक्षक सुनील गुडलर यांच्यासह इर्मिया गुरैया, समीर वारखंडकर, महादेव नाईक, नागेश पार्सेकर, महाबळेश्वर सावंत या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला. याला वरील पोलीस कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असता, सीबीआयने वरील निवेदन सादर केले. त्यानुसार, उच्च न्यायालयाने आरोप निश्चित करण्याचा आदेश रद्द करून पुन्हा सुनावणी घेऊन लवकर निकाल देण्याचे निर्देश दिला.

२०१०मध्ये हणजूण येथे छापा

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) २१ फेब्रुवारी २०१० रोजी मध्यरात्री ११.३५ वाजता हणजूण येथील सेंट अँथनी चॅपेलजवळ छापा टाकून डेव्हीड डिहम ऊर्फ डुडूला ताब्यात घेतले होते. कारवाईत त्याच्याकडून २ लाख ७१ हजार ५०० रुपये किमतीचे ४.४ ग्रॅम हेराॅईन, ५.३४ ग्रॅम कोकेन, ४.३१ ग्रॅम लिक्विड एलएसडी, १.१६ किलो चरस जप्त केल्याचे ‘एएनसी’ने नमूद केले होते. या प्रकरणी ‘एएनसी’ने अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या कलम २० (बी) (ii) (सी), २१ (ए) (बी) आणि २२ (सी) अंतर्गत गुन्हा दाखल करून डुडूला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात डुडूविरोधात आरोपपत्रही दाखल केले होते.