मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करणाऱ्याला तुरुंगवास, दंड

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
20th November, 12:29 am
मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करणाऱ्याला तुरुंगवास, दंड

पणजी : बार्देश तालुक्यातील १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बाल न्यायालयाने ४७ वर्षीय आरोपीला १२ वर्षे सश्रम कारावास आणि १२ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

पीडित मुलीच्या नातेवाईकांनी २० मार्च २०१८ रोजी म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. यावर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर बाल न्यायालयात सुनावणी होऊन दोन्ही पक्षांची बाजू एेकून घेतल्यानंतर तसेच पुराव्यांची दखल घेऊन ४७ वर्षीय आरोपीला दोषी ठरविले. आरोपीला भा.दं.सं.च्या कलम ३७६(२)(१) व (एन) अंतर्गत १२ वर्षे सश्रम कारावास आणि ५ लाख रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास तीन वर्षांची साधी कैद भोगावी लागणार आहे. बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा २०१२ (पॉक्सो) कायद्याच्या १० कलमांतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास आणि २ लाख रुपयांची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास दोन वर्षांची साधी कैद भोगावी लागणार आहे. पॉक्सो कायद्याच्या ६ कलमांतर्गत १२ वर्षांचा सश्रम कारावास आणि ३ लाख रुपयांची शिक्षा दिली आहे. दंड न भरल्यास तीन वर्षांची साधी कैद भोगावी लागणार आहे. गोवा बाल कायद्याच्या ८(२) कलमांतर्गत १२ वर्षांचा सश्रम कारावास आणि २ लाख रुपयांची शिक्षा दिली आहे.

दंड न भरल्यास तीन वर्षांची साधी कैद भोगावी लागणार आहे. सर्व शिक्षा एकाच वेळी भोगायच्या असल्याचा निवाडा बाल न्यायालयाने दिला आहे.