वराला अटक
फोंडाः गोव्यात सध्या फसवणुकीचे वेगवेगळे आणि विचित्र प्रकार समोर येत आहेत. फोंडा तालुक्यात एक वेगळेच आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीने लग्न करतो असे सांगून रजिस्ट्रेशन केले. पहिल्या सहीनंतर तो मुलीच्या घरी जाऊ लागला. तिथे राहू लागला. त्या दरम्यान दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. त्यानंतर दुसरी सहीही झाली. म्हणजे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली. काही दिवसांनी विधीवत लग्न होणार होते पण त्यापूर्वीच नवऱ्या मुलाने रंग बदलला.
लग्नास नकार देत आपल्याला घटस्फोट घ्यायचा आहे असे सांगू लागला. या प्रकारामुळे हादरलेल्या मुलीने शेवटी पोलीस तक्रार केली. फोंडा पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. २२ वर्षीय युवतीने या व्यक्तीविरूद्ध तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी व्यक्तीला गुरुवारी अटक केली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचे आणि फसवणूक केल्याचे अनेक गुन्हे नोंद होतात. या प्रकरणात पहिल्या सहीनंतर संबंध ठेवून दुसऱ्या सहीनंतर घटस्फोट देण्याचा विचार करणाऱ्याला वधुने धडा शिकवला आहे.