कारवार : गोव्यात उपलब्ध असलेली दारू स्वस्त असल्याने देशी पर्यटकांत ती विशेष लोकप्रिय आहे. याच कारणास्तव अनेकदा गोवा निर्मित दारूची गैरमार्गाने तस्करी केली जाते. हा प्रकार रोखण्यासाठी कर्नाटकच्या अबकारी खात्याने कंबर कसली आहे. अशाच एका प्रसंगी, गोव्यात मौजमजा करून पुन्हा आपल्या गावी परतणाऱ्या कर्नाटकातील पर्यटकांना गोवा-कारवार सीमेवरील माजाळी चेकपोस्टवर अडवण्यात आले. अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी बसमध्ये असलेल्या प्रवाशांच्या सामानाची चौकशी केली असता सर्वप्रथम एका व्यक्तीकडून त्यांना दोन बाटल्या आढळून आल्या.
यावेळी सदर अधिकाऱ्यांनी सर्वच प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अन्नपूर्णेश्वरी ट्रॅव्हल्सच्या बसमधून गोव्यातून खरेदी केलेली तब्बल ७७ लिटर्सची गोवा निर्मित दारू तसेच ४ लिटर्स बिअर आढळून आल्यानंतर जप्त करण्यात आली. याप्रकरणी अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी बसच्या चालकाविरोधात बेकायदा मद्यवाहतुकीस प्रोत्साहन दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. तसेच दारू व वाहन असे मिळून एकंदरीत २६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
माजाळी विभागाचे अबकारी उपनिरीक्षक नागराज कोटगी यांनी आपल्या पथकासह सदर कारवाईस मूर्तस्वरूप दिले. मागेच कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी अबकारी विभागाची बैठक घेऊन गोव्यातून होणाऱ्या दारू तस्करी प्रकरणी गोवा सीमेवर कडक तपासणी करण्याचे तसेच धडक छापेमारी करण्याचे आदेश दिले होते. यासाठी विविध ठिकाणी चेकपॉईंट्स उभारण्यात आले असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जाते.