तिसवाडी :अपघाती मृत्यूनंतर संबंधिताच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या रकमेच्या मर्यादेत वाढ

मिळणार १० लाख रुपये. पर्वरी सचिवालयात पार पडलेल्या रस्ता सुरक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चेअंती प्रस्ताव मंजूर

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
6 hours ago
तिसवाडी :अपघाती मृत्यूनंतर संबंधिताच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या रकमेच्या मर्यादेत वाढ

पणजी :  राज्यात घडलेले रस्ते अपघात आणि त्यात झालेल्या जीवितहानीमुळे अनेक हसते खेळते संसार उद्ध्वस्त झालेत. या अपघातात कुटुंबप्रमुख किंवा वंशाचा दिवा मृत्युमुखी पडल्याने अनेक कुटुंबांचे भविष्य अंधारात गेल्याचेही अनेकदा दृष्टीस पडते. अशा घटनेनंतर कुटुंबाला पुन्हा सावरण्याची संधी मिळावी यासाठी गोवा सरकारने काही वर्षांपूर्वी अपघाती मृत्यूनंतर संबंधिताच्या  कुटुंबीयांना २ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते. दरम्यान आज पर्वरी सचिवालयात पार पडलेल्या रस्ता सुरक्षा मंडळाच्या बैठकीत भरपाईची रक्कम वाढवण्याचा प्रस्तावावर रीतसर चर्चा झाली. या चर्चेअंती  नुकसान भरपाई रकमेची मर्यादा ही २ लाख रूपयांवरून १० लाख रूपये करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला

राज्याचे वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला वाहतूक, सार्वजनिक बांधकाम, पोलीस खात्याचे अधिकारी व इतर सदस्य उपस्थित होते. अपघातात मृत्यू झाल्यास २ लाख रूपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद योजनेत आहे. तसेच या योजनेंतर्गत गंभीर जखमी, किरकोळ जखमी झालेल्यांनाही आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. अपघातांची कारणे व उपाययोजना यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अपघातांच्या कारणांचा शोध घेउन त्यावर उपाय सुचविण्याचे निर्देशही यावेळी विविध खात्यांना देण्यात आलेत. बेदरकारपणे वाहन चालविणे, दारू पिऊन वाहन चालवत नियमांची पायमल्ली करणे ही अपघातास कारणीभूत ठरणारी काही ठळक कारणे आहेत. दारू पिऊन गाडी चालवणे धोक्याचे आहे  यासाठी रात्रीच्या वेळी पब्स व बारच्या परिसरात अॅप टॅक्सीची व्यवस्था असायला हवी. अपघात झाल्यानंतर अपघातस्थळी लवकरात लवकर १०८ अॅम्बुलन्स हजर होईल यासाठीही उपाययोजना करण्याचे निर्देश दिले गेले.

रस्ता सुरक्षेसाठी तरूण वर्गासह सर्व नागरिकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. यासाठी लघुपट, ​जिंगल्स तसेच रस्ता सुरक्षा फलकांची गरज आहे. रस्त्यावरील भटकी कुत्रे व गुरे ही सुद्धा मोठी समस्या आहे. चिन्हांकित केलेले ब्लॅक स्पॉट्स मार्च २०२५पर्यंत दुरूस्त करण्यात येतील. याबैठकीत ब्लॅक स्पॉट दुरूस्त करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आले आहेत.


हेही वाचा