गुरुवारपासून जुने गोवेत सेंट झेवियरच्या भक्तांचा महासागर लोटणार आहे, तर पणजी सुवर्ण मयुराच्या स्पर्धेत उतरलेल्या चित्रपट तारे तारकांमुळे ग्लॅमरच्या लाटांवर तरंगणार आहे.
जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियरचे दहा वर्षांनी होणारे शवप्रदर्शन २१ नोव्हेंबरपासून सुरू होत असताना त्याच्या पूर्वसंध्येला गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाला. दोन्ही सोहळे गोव्याची प्रतिमा देशातच नव्हे तर आंतराष्ट्रीय स्तरावर उंचावण्यासाठी निश्चितच फायद्याचे ठरणार आहेत. जगभरातील प्रसारमाध्यमे, भाविक, चित्रपट तारका, चित्रपट अभ्यासक एकाचवेळी गोव्यात असतील. चित्रपट महोत्सव २८ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. हजारो चित्रपटप्रेमी, चित्रपट कलाकार या आठ दिवसांत गोव्यात येतील. इफ्फीचे हे ५५ वे वर्ष. गोव्यात सलगपणे वीस वर्षे इफ्फी आयोजित केला जात आहे. सुरुवातीच्या काही वर्षांतील आयोजनानंतर इफ्फी कायमचा गोव्यातच आयोजित करण्यासाठी केंद्राने मान्यता दिली आणि आतापर्यंत इफ्फी गोव्यातच होत आहे.
इफ्फीच्या आयोजनासाठी मदत व्हावी म्हणून राज्य सरकारने मोठ्या बजेटची गोवा मनोरंजन सोसायटीही स्थापन केली. या सोसायटीमार्फतच गोव्यातून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाशी समन्वय साधला जातो. गोव्यात इफ्फीसाठी आवश्यक त्या सुविधा उभारल्या आहेत. आयनॉक्स आणि कला अकादमीचा चित्रपट प्रदर्शनासाठी वापर होतो. गेल्या काही वर्षांपासून दोनापावला येथे जागतिक दर्जाचे प्रशस्त असे परिषदगृह उभारण्याची घोषणा होत असते, पण आतापर्यंत त्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही. काहीवेळा निविदाही काढल्या गेल्या, पण शेवटपर्यंत प्रकल्प विकसित करण्यासाठी पात्र कंपनीची निवड झाली नाही. सरकार कोणाचेही असो, हा प्रकल्प एकाच ठिकाणी इफ्फी साजरा करण्यासाठी योग्य जागा असेल असा विचार करून गेल्या सतरा अठरा वर्षांपासून या कन्व्हेन्शन सेंटरबाबत प्रत्येक वर्षी विधाने केला जातात. मुळात सध्याच्या स्थितीत इफ्फीचे आयोजन चांगल्या प्रकारे होत आहे. मनोरंजन सोसायटी, आयनॉक्स आणि कला अकादमीच्या परिसरात इफ्फीची जत्रा भरते. पणजी शहरात मांडवी नदीच्या किनाऱ्यावर भरणारी चित्रपटांची जत्रा अनेकांना आकर्षित करत असते. सध्याची स्थिती पाहता इफ्फीसाठी जास्त साधन सुविधांची गरज नाही. कारण फक्त इफ्फीचाच विचार करायचा झाला तर सध्याची थिएटर्स इफ्फीच्या कामी येत आहेत. वर्षभर वापरात न येणाऱ्या साधन सुविधा तयार करून बांबोळीच्या इनडोअर स्टेडियमसारख्या नंतर त्या पडून राहण्याऐवजी सध्या असलेल्या सुविधांमध्येच सुधारणा करून इफ्फीसाठी वापरणे योग्य
ठरेल.
१९५२ साली मुंबईहून सुरू झालेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरुवातीला काही वर्षांच्या अंतराने व्हायचा. १९७५ सालापासून दरवर्षी त्याचे आयोजन सुरू झाले. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई अशा वेगवेगळ्या ठिकाणी होणारा चित्रपट महोत्सव २००४ साली गोव्यात आला. त्यावर्षीचा महोत्सव ३५ वा होता. सुरुवातीला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात दहा दिवस होणारा महोत्सव गोव्यातील ३ डिसेंबरच्या सेंट फ्रान्सिस झेवियरच्या फेस्तमुळे नोव्हेंबर महिन्यातच आटोपण्याचे ठरले. २०२१ चा कोविडच्या काळातचा महोत्सव वगळता गेल्या २०११ पासून नोव्हेंबरमध्ये सुरू करून हा महोत्सव आठ नऊ दिवसांत म्हणजे नोव्हेंबरमध्येच आटोपला जातो. या आठ दिवसांत गोव्यात येणाऱ्या शेकडो चित्रपट ताऱ्यांसह, हजारो प्रतिनिधींचा पाहुणचार करण्यासाठी गोव्याने आजपर्यंत कुठलीच कसर सोडलेली नाही. त्यामुळे केंद्रानेही कधी गोव्यातील हा महोत्सव दुसऱ्या ठिकाणी नेण्याविषयी विचार केला नाही. गोव्याने महोत्सव कायमस्वरुपी आयोजित करण्यासाठी केंद्राला मनवल्यापासून आजपर्यंत गोव्याने पूर्ण ताकदीनिशी महोत्सवाचे आयोजन केले आहे. काहीवेळा दक्षिणात्या लॉबीने गोव्यात कायमस्वरुपी होणारा चित्रपट महोत्सव दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी प्रयत्न केला असला, तरी तो यशस्वी झालेला नाही. उलट इफ्फीत फक्त बॉलिवडूचा होणारा बोलबाला टाळण्यासाठी बंगाली, तमिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम, मराठी अशा भारतीय भाषांमधील चित्रपट क्षेत्रातल्या तारकांना, तंत्रज्ञांना आमंत्रित करून वेगवेगळे उपक्रमही राबवले जातात. विदेशातील अनेक भाषांतील चित्रपट अनेकदा केंद्रस्थानी असतात. बहुतांशवेळा विदेशी चित्रपटानेच इफ्फीची सुरुवात होते. त्यामुळे हा चित्रपट महोत्सव जागतिक दर्जाचाच असतो. दरवर्षी त्यात नाविन्याची भर पडत असल्यामुळे त्याचा दर्जाही उंचावत आहे. गुरुवारपासून जुने गोवेत सेंट झेवियरच्या भक्तांचा महासागर लोटणार आहे, तर पणजी सुवर्ण मयुराच्या स्पर्धेत उतरलेल्या चित्रपट तारे तारकांमुळे ग्लॅमरच्या लाटांवर तरंगणार आहे.