तिसवाडी महालात ज्या चाळीस गावांचा समावेश व्हायचा, त्यात एला किंवा हेळेचा संदर्भ आढळतो. आदिलशाहीचा पराभव केल्यानंतर जेव्हा तिसवाडी महालावर पोर्तुगीज सत्ता स्थापन झाली, तेव्हा नव्या सरकारने राजधानीचा सन्मान हेळेलाच दिला होता.
गोव्यातील तिसवाडी महाल सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धातच पोर्तुगिजांच्या ताब्यात आणण्याच्या दृष्टीने आफोन्स द आल्बुकर्क यांचे षडयंत्र आणि नियोजन यशस्वी ठरले. पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या आणि प्राचीन काळात देश विदेशातील प्रवासी, यात्रेकरू, व्यापारी यांना प्रवेशद्वार ठरलेल्या महालावर ताबा प्रस्थापित केल्यानंतर आफोन्स द आल्बुकर्कने आपल्याबरोबर असलेल्या पोर्तुगीज सैनिक आणि सरदारांना इथल्या रूपवान मुस्लिम स्त्रियांशी विवाहबद्ध होण्यासाठी प्रोत्साहन दिले. जेव्हा तिसवाडी महालावर पोर्तुगिजांचे वर्चस्व प्रस्थापित झाले, तेव्हा हेळे म्हणजेच आजचे ओल्ड गोवा हे राजधानीचे शहर म्हणून नावारूपाला आले होते. १५१० साली आफोन्स द आल्बुकर्कने तिसवाडी महाल जिंकल्यावर जेव्हा हेळे शहरात प्रवेश केला, तेव्हा आपणाला जी विजयश्री प्राप्त झालेली आहे त्याला सेंट कॅथरिनचे आशीर्वाद कारणीभूत असल्याची भावना त्याच्यात होती आणि त्यासाठी हेळेत मांडवी नदीच्या किनारी सेंट कॅथरिनचे कपेल बांधले. १५३४ साली पोप पॉल तृतीय याने या कपेलाचे रूपांतर कॅथेड्रलच्या दर्जात केले. तत्कालीन राज्यपाल जॉर्ज काब्राल यांच्या आदेशाने १५५० साली त्याचा विस्तार करण्यात आला.
मांडवी नदी किनारी वसलेले हे बंदर समृद्ध हेळे गाव गोव्यातील अन्य प्रांतांशी आणि देश विदेशांशी जलमार्गाद्वारे जोडलेले होते आणि त्यामुळे प्राचीन काळापासून या गावाच्या संरक्षणासाठी तटबंदी उभारलेली असावी. आज जेव्हा जेव्हा बांधकाम करण्यासाठी उत्खनन केले जाते तेव्हा तेव्हा या परिसरात गतकालीन ऐतिहासिक वास्तू, तटबंदीचे जीर्णावशेष ठिकठिकाणी सापडत आहेत. गोपकपट्टण या राजधानीच्या शहराचा विद्ध्वंस अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्याने केल्यावर कालांतराने हेळे या मांडवी किनाऱ्यावर वसलेल्या शहराला राजधानीचा दर्जा लाभला. गोवा कदंब नृपती जयकेशी प्रथम याने हेळेला ब्रह्मपुरी स्थापन करून, ज्ञानवंतांना आश्रय दिला तो ११०७ साली. सरस्वतीच्या मंदिराची स्थापना करण्यात आली. परंतु हेळेवर जेव्हा मुस्लिम राजकर्ते सत्तेवर आले, तेव्हा त्यांनी सरस्वतीच्या मंदिराची नासधूस केली. विजयनगर साम्राज्याच्या ताब्यात जेव्हा गोव्याची भूमी आली, तेव्हा माधव मंत्री यांनी आजच्या गोमंतेश्वराच्या मंदिराच्या पायथ्याशी माधव तीर्थाची उभारणी केली असल्याचे संदर्भ आढळतात. गोवा कदंब, विजयनगर राजवटीत मांडवी नदी किनारी वसलेल्या हेळेचे महत्त्व कालांतराने वृद्धिंगत होत गेले. १४४० मध्ये होन्नावरच्या मलिक हुसेन याने गोवा जिंकल्यावर आपली राजधानी हेळेत वसवली. त्यानंतर जेव्हा विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात गोवा आला, तेव्हा सुद्धा राजधानीचा लौकिक हेळेलाच प्राप्त झाला. तिसवाडी महालात ज्या चाळीस गावांचा समावेश व्हायचा, त्यात एला किंवा हेळेचा संदर्भ आढळतो. आदिलशाहीचा पराभव केल्यानंतर जेव्हा तिसवाडी महालावर पोर्तुगीज सत्ता स्थापन झाली, तेव्हा नव्या सरकारने राजधानीचा सन्मान हेळेलाच दिला होता. सोळाव्या शतकात हेळेचे नामकरण सिदाद द गोवा असे केल्यानंतर तेथील मंदिरे, मशिदी पूर्णपणे जमीनदोस्त करण्याचे सत्र त्यांनी व्यापक प्रमाणात राबवले. मुस्लिमांच्या ताब्यात असलेला घोड्यांचा व्यापार त्यानंतर जवळपास दोनशे वर्षे पोर्तुगिजांनी आपल्या ताब्यात मिळवला आणि घोड्यांच्या व्यापारातून प्रचंड पैसा कमावला.
पैसा, प्रतिष्ठा सहजासहजी मिळाल्याने त्याची नशा त्यांच्या डोक्यात शिरली. आर्थिक सुबत्तेमुळे दुर्व्यसने, चंगळवाद बोकाळला आणि त्यामुळे मदिरा आणि मदिराक्षींची विलक्षण चटक त्यांना लागली. अनैतिक स्त्री समागम आणि लैंगिकतेतील कहरामुळे गुप्तरोगासारख्या व्याधीने हा हा म्हणता पोर्तुगीज अधिकारी, सरदार, सैनिक आणि अन्य लोकांचा बळी गेला.
जेजुईट इतिहासकार फ्रान्सिस्को द सौझा याने आपल्या ओरिएंत काँकिस्तादो या ग्रंथात गोवा शहराचा जो ऱ्हास झाला, त्याला या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्रोतात हत्तीचे पिल्लू मरण पावले आणि त्यात ते कुजल्याकारणाने पेयजल प्रदूषित झाले आणि हे प्रदूषित पाणी पाऊन रोगराई पसरल्याने शहराचा ऱ्हास झाला. एकेकाळी उंच प्रासाद, भव्य इमारती, बाजारपेठा यामुळे गजबजलेले हे शहर त्याच्या नावलौकिकामुळे यशोशिखरावर असताना रोगराईमुळे विस्मृतीत जाऊ लागले आणि शेवटी १८८४ साली हेळेहून पोर्तुगीज साम्राज्याची नवी राजधानी ताळगावातल्या एका वाड्यावर नेली, जी पणजी या नावाने प्रसिद्धीस पावली. पोर्तुगीजांनी इथे सेंट पॉल महाविद्यालयाची स्थापना करून ख्रिस्ती धर्म आणि संस्कृतीच्या शिक्षणाची सोय उपलब्ध केली. सेंट फ्रान्सिस झेवियर या महाविद्यालयात काही काळ स्थायिक झाला आणि ख्रिस्ती धर्माचा प्रचार सक्तीने आरंभला. १८३२ साली महाविद्यालयाची इमारत जमीनदोस्त झाली. जेझुईट पंथियांनी हेळेतील हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या समस्त खाणाखुणा नष्ट करण्याचा कसोशीने प्रयत्न केला आणि त्याचा विरोध करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर अन्याय, अत्याचाराचे सत्र आरंभले. धर्मसमीक्षण संस्थेद्वारे इथला चेहरा मोहरा त्यांनी पूर्णपणे बदलून टाकला. हिंदू मंदिरे, तीर्थक्षेत्रे, बह्मपुरी यामुळे मांडवी किनाऱ्यावरील हे पवित्र स्थळ समूळ नष्ट केले. मारुती, भूमिका, नारायण, दत्तात्रय, रवळनाथ आदी देवदेवतांची एकापेक्षा एक सुंदर मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. आज खांडोळा येथील महागणपती संस्थानातील जुनी मूर्तीही पूर्वाश्रमी एला येथे होती, तेथून ती दीपवती बेटावर नेण्यात आल्याचे संदर्भ मिळतात. याशिवाय दुर्गादेवीचे मंदिर या गावची शान होती.
ब्रह्मपुरी येथील शिवाची उपासना गोवेश्वराच्या नावाने व्हायची, तेथील प्राचीन मूर्ती नष्ट करण्यात आली. सोळाव्या शतकात आर्चबिशप आलेक्सो द मिनेझिसच्या आदेशाने होली ट्रिनिटी चर्चचे जेथे बांधकाम करण्यात आले, तेथे शिवाचे प्राचीन मंदिर आणि पवित्र तळी असल्याचे मानले जाते. इथे असलेल्या मंदिराचा विद्ध्वंस केल्यावर जे जीर्णावशेष सापडले होते, त्यांचे संदर्भ पोर्तुगीज दफ्तरात मिळालेले आहेत. गजलक्ष्मीचे शिल्प बॉम जेझसच्या परिसरात सापडले होते. आज हेळेचा उल्लेख ओल्ड गोवा असा होत असून, सेंट ऑगस्टीन मनोरा, सांता मोनिका प्रार्थनागृह आणि आशिया खंडातील नन्सचे शिक्षण देणारे पहिले विद्यालय, बासिलिका ऑफ बॉम जेझस, सी कॅथेड्रल अशा वास्तूंमुळे हेळे शहराचे रूपांतर तत्कालीन पोर्तुगीज सरकारने पूर्वेकडचे रोम म्हणून करण्यात यश संपादन केले. एकेकाळी गोरक्षनाथाच्या मठाचे अवशेष या पवित्रभूमीत होते, त्याचे समूळ उच्चाटन करण्यात आले. आज युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत येथील भव्यदिव्य ख्रिस्ती प्रार्थनागृहांचा समावेश केलेला आहे. आज ग्रामपंचायत क्षेत्रातील ८००.५४ हेक्टरातील हा गाव एका बेशिस्त आणि अराजक शहराच्या रूपात विकसित होत आहे.
- प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५