राज्यातील किनाऱ्यांवर सध्या देशी विदेशी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. इफ्फीत सहभागासाठी देशी, विदेशी चित्रपटप्रेमी गोव्यात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर चुकीच्या माहितीच्या आधारे देशपातळीवर गोव्याची बदनामी करणाऱ्या बातम्या पसरणे हे पर्यटनाला मारक ठरू शकेल. सरकारने हा प्रकार गांभीर्याने घेत कारवाईचा बडगा कायम राखावा. तसेच पर्यटनाबाबतच्या समस्या सोडवण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
गोव्याच्या पर्यटनाबाबतीत चुकीच्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अहवालामुळे गेल्या आठवड्यात गोव्याचे पर्यटन चर्चेत आले होते. समाजमाध्यमांवरील व्हायरल पोस्टमध्ये परदेशी पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली आहे. गोव्यातील पर्यटनामध्ये घसरण होत असल्याचे म्हणण्यात आले होते. या पोस्टवर समाजमाध्यमांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक वापरकर्त्यांनी गोव्यातील त्यांचे वाईट अनुभवही शेअर केले होते. यामुळे सुरू झालेल्या वादानंतर गोव्याच्या पर्यटन विभागाने स्पष्टीकरण देत पर्यटकांची संख्या कमी झाल्याचे नाकारले होते. त्यानंतर चुकीची माहिती देत गोव्याच्या पर्यटनावर परिणाम होणारी पोस्ट लिहिणाऱ्या उद्योजकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतील घट ही येथील काही समस्यांमुळे व पर्यटकांशी झालेल्या गैरवर्तणुकीमुळे होत असल्याचेही याआधी समाजमाध्यमांवर पसरलेले होते. असाच गेल्या वर्षीही काही लोकांनी गोव्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना यश आले नाही. मात्र, गोव्याची थायलंड आणि श्रीलंकासारख्या आंतरराष्ट्रीय स्थळांशी तुलना करणे चुकीचे आहे. गोवा हे नेहमीच पर्यटकांचे आवडते स्थळ राहिलेले आहे.
राज्य सरकारने पर्यटनाच्या बाबतीत देशांतर्गत किंवा जागतिक स्तरावर होत असलेली चुकीची टीका खपवून घेता कामा नये. गोवा विधानसभेत आणि संसदेतही गोव्यातील पर्यटकांच्या संख्येची आकडेवारी देण्यात येते, ती माहिती सार्वजनिक माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचवल्यास लोकांना सत्य समजून येईल व लोक चुकीच्या माहितीच्या आधारे तयार केलेल्या अहवालांना महत्त्व देणार नाहीत. गोव्यातील बदनामीचा मुद्दा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी गांभीर्याने घेत जागतिक स्तरावर आणि देशांतर्गत पर्यटनासाठी आवडते ठिकाण असलेल्या गोव्याबाबत खोटा व चुकीचा प्रचार करणे ही योजना किंवा छुपा अजेंडा असल्याचे दिसत असल्याचे सांगत चुकीची माहिती देत गोव्याला बदनाम करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचनाही दिलेल्या आहेत. सुमारे १६ लाख लोकसंख्येच्या गोव्याकडून सुमारे १ कोटी पर्यटकांना योग्य सेवा देण्याचे काम चांगल्याप्रकारे सुरू असताना यात मिठाचा खडा टाकणाऱ्यांवर कारवाई होणे, हे पर्यटनाच्या भवितव्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
अजय लाड,
(लेखक दै. गोवन वाार्तचे दक्षिण गोवा ब्युरोचिफ आहेत.)