महाराष्ट्राच्या तुलनेत भाजपसाठी झारखंडचा पेपर सोपा जाईल अशीच चिन्हे दिसतात. महाराष्ट्रात निदान काठावर तरी पास व्हावे यासाठीच त्यांनी 'धर्मयुद्ध' छेडलेले दिसते.
महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांकडे सध्या तमाम देशवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. अवघ्या चार पाच दिवसांतच या दोन्ही राज्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या नावाखाली या दोन्ही राज्यांत नेमके काय चालले आहे, हे सांगणे कठीण आहे. विशेष करून महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात 'व्होट जिहाद', 'व्होट धर्मयुद्ध' या नावांची लेबले लावून प्रचार व्हावा हे तर खूपच दुर्दैवी आहे, पण 'सत्तेसाठी काहीही' याचा प्रत्यय निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात प्रकर्षाने दिसून आला. कोणी 'व्होट जिहाद'चा नारा लावला तर कोणी त्यास हे तर 'धर्मयुद्ध'च असल्याचे सांगत एकप्रकारे धर्मयुद्धच छेडले. निवडणुकीच्या नावाखाली 'धर्मयुद्ध' छेडले जाऊ लागले तर भविष्यातील निवडणुकांना याहूनही वेगळे आणि गंभीर रूप मिळणारच नाही, हे आज कोणी छातीठोकपणे सांगू शकतील असे वाटत नाही आणि हे सर्व टाळण्यातच आपल्या देशाचे हित आहे. महाराष्ट्रातील यावेळची विधानसभा निवडणूक ही आतापर्यंत झालेल्या निवडणुकांच्या तुलनेत वेगळी असेल असे सर्वानाच आधी वाटत होते आणि बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे तसे समजण्यात कोणाची चूकही नव्हती. आज प्रत्यक्ष मतदान तोंडावर येऊन ठेपले असताना मात्र ही निवडणूक वेगळीच नव्हे तर देशाला एक वेगळाच संदेश देऊ शकेल असे रूप तिने धारण केले आहे. लोकसभा निवडणुकीत 'व्होट जिहाद' लादला गेला या दाव्यात काही चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही पण त्याविरुद्ध 'धर्मयुद्धा'ची भाषा बोलली जात असेल तर जे काही चालले आहे ते योग्य आहे, असे म्हणता येणार नाही.
महाराष्ट्रात जाहीर प्रचाराच्या तोफा काल सोमवारी थंडावल्या आणि झारखंडातही दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे उद्या बुधवारीच होत असल्याने तेथेही वेगळी स्थिती नाही. महाराष्ट्र आणि झारखंड ही दोन्ही राज्ये गमावून विरोधकांना जसे चालणार नाही तसेच भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाही ही राज्ये जिंकून, विरोधकांनी आणि विशेष करून काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या आधारे दिलेल्या आव्हानाचा बुडबुडा फोडायचा आहे. अशा परिस्थितीत निवडणुका चुरशीच्या होणे अपरिहार्य होते. महाराष्ट्राच्या तुलनेत केंद्रातील भाजपला झारखंड राज्यात तसे जोरकस आव्हान मिळेल असे सध्याची तेथील राजकीय स्थिती पाहता वाटत नाही. महाराष्ट्रात मात्र भाजप आणि मित्र पक्षांना आपली सत्ता राखण्यासाठी बराच घाम गाळावा लागत आहे आणि या निवडणुकीस 'धर्मयुद्धा'चे स्वरूप मिळण्याचे तेही एक प्रमुख कारण म्हणता येईल. काँग्रेस पक्ष आपल्या 'तुष्टीकरण' कार्डाचा वापर वा गैरवापर करील याबद्दल कोणालाही संदेह नव्हता. लोकसभा निवडणुकीत हे 'कार्ड' अर्थातच त्यांच्या कामी आले आणि भाजपप्रणीत आघाडीला त्याची भरपाई महाराष्ट्रात करण्याची संधी मिळाली. सुरुवातीस संयमाने चालू असलेल्या प्रचाराला अखेरच्या टप्प्यात वेगळेच वळण मिळाले आणि त्यास अनेकांना 'धर्मयुद्ध' दिसू लागले आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांना वक्फ बोर्ड कायद्याच्या विरोधात केंद्रातील सत्तारूढ पक्षाने घेतलेल्या भूमिकेचीही पार्श्र्वभूमी असल्याने 'तुष्टीकरण' कार्ड अधिकच प्रभावी ठरण्याचा धोका होता आणि अनेक वेळा तो प्रकटही झाला.
संयुक्त सांसदीय समितीकडे सध्या वक्फ बोर्डाचे प्रकरण विचारार्थ असूनही समितीच्या प्रत्यक्ष बैठकीतही विरोधक जो आकांडतांडव करत आहेत, त्याचे समर्थन करता येणार नाही. महाराष्ट्रातील निवडणुकांना अशीही पार्श्र्वभूमी लाभल्याने प्रचाराला वेगवेगळी वळणे मिळत गेली आणि शेवटी व्होट जिहाद विरुद्ध धर्मयुद्ध असे स्वरूप त्यास मिळत गेले. अर्थात यास महाविकास आघाडीतील घटक पक्षही तेवढेच जबाबदार असल्याचे अनुमान काढता येईल. महाराष्ट्रात निवडणूक प्रचाराचा स्तर वा पातळी यावेळी एवढी घसरली की निवडणूक आयोगालाच याची दखल घ्यावी लागेल. उबाठा शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचे तर राजकीय अस्तित्वच संपू शकेल अशी वेळ त्यांच्यावर आली असल्याने साध्या बॅग तपासणीपासून क्षुल्लक अशा गोष्टींवरूनही ते सध्या घसा ताणत ओरडताना महाराष्ट्र पाहत आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे निश्चितच अस्तित्वाची लढाई ठरणार आहे . त्यासाठी संजय राऊत यांच्यासह ते लढाई लढत आहेत. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत शरद पवार यांचाही त्यांना पाठिंबा असला तरी या दोघांच्या खांद्यावर काँग्रेसचे जे ओझे पडले आहे, त्याखाली ते दडपून गेले आहेत. याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न महायुतीचे नेते करत आहे आणि त्यात अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आघाडीवर आहेत. आपली खेळणी चोरीला गेल्यानंतर वा कोणी हिसकावून नेल्यानंतर लहान मुले जशी रडतात तसेच काहीसे रडगाणे उद्धव ठाकरे अजून आपल्या वडिलांची छबी आणि पक्षाच्या चिन्हावरून गाताना आम्ही अजून पाहतो तेव्हा अशा निवडणुकीसाठी त्यांच्याकडे अन्य मुद्देच नाहीत, याचा प्रत्यय येतो.
महाराष्ट्रातील जनता उद्या आपले २८८ आमदार निवडण्यासाठी मतदान करणार आहे. भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी सत्तेचा गड पुन्हा जिंकण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. 'धर्मयुद्ध' हे अस्त्र तर निर्वाणीचे होते. अल्पसंख्याकांना कायम चुचकारून स्वार्थ साधणाऱ्या काँग्रेस पक्षासाठी हे अस्त्र अपेक्षित नव्हते, पण सर्वसामान्य मतदारही आज बराच समंजस असल्याने त्यांच्याकडून सत्ताधारी युतीला अपेक्षा आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे आपले कार्ड खेळताना मुख्यमंत्रिपद आपल्याला हुकणार नाही, याची दक्षता घेत वेगळेच काही तरी करत आहेत. अशावेळेस महाराष्ट्रात यावेळी पुन्हा कमळ फुलणार काय? या प्रश्नाबरोबरच एकनाथ शिंदेंच्या धनुष्यातून बाण सुटेल काय किंवा उबाठाच्या ठाकरे यांची विझलेली मशाल पेटेल काय, यासारखे बरेच प्रश्न विचारले जातात. शरद पवारांची तुतारी निश्चितच वाजेल असे राजकीय अभ्यासकांना वाटते याचे कारण की वृद्धापकाळातही आपल्या लेकीसाठी ते ज्या तडफेने वावरतात, त्याबद्दल त्यांना लोकांची असलेली सहानुभूती. नाना पाटोळेंचा 'हात' काही तोलामोलाची कामगिरी करून दाखवणार का किंवा अजित पवारांच्या घड्याळाची 'टिकटिक' कितपत टिकेल, असेही प्रश्न आज विचारले जातात. या सर्व प्रश्नांची उत्तरे मतदारच देणार आहेत आणि शनिवारी एकदाच्या मतपेट्या बोलायला लागल्या की त्याची उत्तरे पटापट मिळतील.
झारखंडमध्येही जेएमएमच्या धनुष्यातून पुन्हा बाण सुटेल का, हा लाखमोलाचा प्रश्न असला तरी भाजपने यावेळी त्यांना पूर्ण घेरलेले दिसते. काँग्रेसची भाजपलाच मदत होईल असेही सांगितले जाते. महाराष्ट्राच्या तुलनेत भाजपसाठी झारखंडचा पेपर सोपा जाईल अशीच चिन्हे दिसतात. महाराष्ट्रात निदान काठावर तरी पास व्हावे यासाठीच त्यांनी 'धर्मयुद्ध' छेडलेले दिसते.
वामन प्रभू, (लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत) मो. ९८२३१९६३५