निवडणुकीत अनेक पक्षांचे अस्तित्व पणाला

Story: राज्यरंग |
19th November, 12:15 am
निवडणुकीत अनेक पक्षांचे अस्तित्व पणाला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांवर एका टप्प्यात २० रोजी मतदान होणार असून २३ रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीत अनेक पक्ष उभे असले तरी विजयी आकडा महायुती गाठणार की महाविकास आघाडी हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक असल्याने या पक्षांना जनतेने किती स्वीकारले, हे आता दिसून येईल. याशिवाय इतर राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षही आहेत.

राज्यात गेल्या पाच वर्षांत दोन मोठी बंड झाली. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बाहेर पडले. तर, अजित पवार हे राष्ट्रवादीतून बाहेर पडले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे अध्यक्ष झाले. तर, उद्धव ठाकरे हे शिवसेना उबाठा या पक्षाचे प्रमुख आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादीचे तर शरद पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष आहेत. एकनाथ शिंदे ४० आमदारांनिशी राज्याचे मुख्यमंत्री झाले. नंतर आलेल्या अजित पवारांकडेही ४० आमदार होते. त्यांना उपमुख्यमंत्रिपद मिळाले. पण पक्षफुटीमुळे महाराष्ट्रात वेगळेच चित्र पहायला मिळाले.

पक्षफुटीनंतर विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ठाकरे विरुद्ध शिंदे आणि अजितदादा विरुद्ध शरद पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून राष्ट्रवादीत दोन तर शिवसेनेतही दोन गट झाले आहेत. हे गट एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. वैयक्तिक वादही त्यानिमित्ताने सर्वांसमोर येत आहेत. या चारही गटांच्या अस्तित्वाची परीक्षाच या निवडणुकीतून होणार आहे.

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्ष (बसप) महाराष्ट्रात सर्वाधिक २३७ जागा लढवत आहे. दुसऱ्या क्रमांकावर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आहे. पक्षाने २०० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भाजपने एकूण १४९ उमेदवार उभे केले आहेत. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) १२५ जागांवर निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) ५९, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद पवार) ८६, शिवसेना (एकनाथ शिंदे) ८१, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९५ जागांवर निवडणूक लढवित आहेत. निवडणुकीत पक्षांची संख्या मोठी असली तरी लोक कोणाला स्वीकारतात, हे या निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.

प्रसन्ना कोचरेकर