शंकरसिंह वाघेलांचा नवा राजकीय डाव

Story: राज्यरंग |
02nd December, 09:19 pm
शंकरसिंह वाघेलांचा नवा राजकीय डाव

राजकारणापासून दूर गेलेले माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला वयाच्या ८४ व्या वर्षी पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याने गुजरातमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. वाघेला यांनी ‘प्रजा शक्ती डेमोक्रॅटिक पार्टी’ या नव्या राजकीय संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली. पक्षाची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. वडोदराचे माजी महापौर राजेंद्रसिंह राठोड यांची पक्षाध्यक्षपदी, गांधीनगरचे माजी महापौर युसूफ परमार यांची सरचिटणीस आणि पार्थेश पटेल यांची कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

वाघेला यांचा तळागाळातील लोकांशी संपर्क गुजरातच्या इतर कोणत्याही राजकारण्यांच्या तुलनेत अतुलनीय होता. तथापि, त्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आणि गुजरातच्या राजकारणात अनेक चढउतार आले. 

२०१७ मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर वाघेला यांनी जनविकल्प मोर्चाची स्थापना केली. त्यानंतर २०१९ मध्ये ते एनसीपीमध्ये सामील झाले परंतु २०२० मध्ये राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाचे प्राथमिक सदस्य म्हणून त्यांनी आपले पद सोडले. एनसीपी सोडल्यानंतर, त्यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये संघटना स्थापन करून विधानसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा विचार होता, परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी विचार बदलला. 

राजकारणात बरीच वर्षे घालवलेल्या शंकर सिंह यांना ११ वेळा राजकीय पेचप्रसंगाचा सामना करावा लागला आहे. वाघेला २३ ऑक्टोबर १९९९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर भाजपपासून वेगळे होऊन राष्ट्रीय जनता पक्षाची स्थापना केली. ते एक वर्ष पाच दिवस मुख्यमंत्री होते. यानंतर दिलीप पारीख यांना मुख्यमंत्री करावे लागले. दिलीप पारीख १८८ दिवस मुख्यमंत्री होते. यानंतर केशुभाई पटेल आणि नंतर नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाले. शंकर सिंह वाघेला हे गुजरात मॉडेलवर अनेक दिवसांपासून प्रश्न उपस्थित करत आहेत. नुकतेच त्यांनी गुजरातमध्ये दारूबंदी लागू करण्याचे जाहीरपणे समर्थन केले होते. वाघेला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही नुकतीच भेट घेतली आहे. राज्यात लवकरच पंचायत निवडणुका होणार आहेत, अशा वेळी वाघेला पक्षीय राजकारणात पुन्हा सक्रिय होणार असल्याचे संकेत आहेत. 

ते पंतप्रधान मोदींना फारसे भेटत नसले तरी त्यांची त्यांच्याशी घट्ट मैत्री आहे. राज्यात भाजपला मजबूत करण्यासाठी वाघेला, सुरेश मेहता, केशुभाई पटेल, काशीराम राणा यांचा मोठा वाटा आहे. आता राजकीय संघटनेची स्थापन करून आगामी पंचायत निवडणुकांवर त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे दिसते.

- प्रसन्ना कोचरेकर