अमेरिकेत एलॉन मस्कचा पक्ष तग धरेल ?

एलॉन मस्क यांचा पारंपरिक माध्यमांवर ताबा नसला तरी, एक्स या माध्यमावर त्यांचे वर्चस्व आहे. हा प्लॅटफॉर्म वापरून ते जनमत तयार करू शकतात, त्यामुळे त्यांनी जर एखादा पक्ष स्थापन केला, तर त्यासाठी भक्कम माध्यम मिळेल.

Story: विचारचक्र |
09th July, 09:07 pm
अमेरिकेत एलॉन मस्कचा पक्ष तग धरेल ?

भारतात सुमारे २,७०० राजकीय पक्ष आहेत, त्यापैकी फक्त सहा पक्ष राष्ट्रीय मानले जातात, तर ५७ पक्ष हे राज्यात मान्यता असलेले पक्ष आहेत. ज्या पक्षांना मान्यता नाही, पण नोंदणी करण्यात आली आहे असे २,६०० पक्ष देशात आहेत. काही पक्ष नंतर मान्यता गमावतात, तर काही नव्याने स्थापन केले जातात हे आपण पाहतोच. अशा घडामोडींमुळे भारतीयांना आश्चर्य वाटत नाही, पण अमेरिकेत जेथे दोनच पक्ष आहेत, तेथे तिसरा पक्ष येणार असेल तर जगभरात त्याची चर्चा होत राहते. डेमोक्रॅट्स व रिपब्लिकन्स अशा दोन प्रमुख पक्षांमध्ये नेहमीच चुरस असते. अलीकडे दोन्ही पक्षांतील सदस्यांमध्ये असंतोष असल्याचे दिसून येते. अनेक अमेरिकन नागरिकांना वाटते की दोन्ही पारंपरिक पक्ष अपयशी ठरत आहेत. मध्यममार्गी, स्वतंत्र विचारसरणीच्या नागरिकांना एक पर्याय हवा आहे. एलॉन मस्क यांच्या नव्या पक्षाबाबत चर्चा होत असली तरी त्यांनी अद्याप अधिकृतपणे राजकीय पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केलेले नाही. मात्र, २०२४ च्या अमेरिकन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे राजकारणातील सक्रिय विधान, राजकीय नेत्यांवर टीका आणि तिसऱ्या पक्षाच्या पर्यायाच्या चर्चेमुळे अनेक तज्ज्ञ आणि माध्यमे त्यांच्या संभाव्य पक्षाची चर्चा करत आहेत. एलॉन मस्क पूर्वी डेमोक्रॅट पक्षास पाठिंबा देत असत, परंतु २०२२ नंतर त्यांनी रिपब्लिकन विचारांशी जुळणारी मते मांडायला सुरुवात केली. त्यांनी ट्विटरवर डाव्या विचारसरणीवर, प्रगतीशील धोरणांवर आणि पर्यावरणविषयक अतिरेकी नियमांवर टीका केली. ते विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार करताना दिसले. त्यांनी एक्स या प्लॅटफॉर्मला "स्वातंत्र्याचे व्यासपीठ" म्हणत राजकीय चर्चा, निवडणूक प्रचाराचे केंद्र केले आहे. त्यांनी टकर कार्लसनसारख्या डाव्या विरोधक पत्रकारांना प्लॅटफॉर्मवर आणले, जो रिपब्लिकन मतदारांमध्ये लोकप्रिय आहे. त्यांनी रॉबर्ट केनेडी (ज्युनियर) या स्वतंत्र उमेदवाराला समर्थन देण्याचे संकेतही दिले होते. मस्क यांचा पारंपरिक माध्यमांवर ताबा नसला तरी एक्स या माध्यमावर त्यांचे वर्चस्व आहे. हा प्लॅटफॉर्म वापरून ते जनमत तयार करू शकतात, त्यामुळे त्यांनी जर एखादा पक्ष स्थापन केला, तर त्यासाठी भक्कम माध्यम हाती असेल.

प्रभावशाली ब्रँड व लोकप्रियता यामुळे एलॉन मस्क हे नाव जागतिक स्तरावर ओळखले जाते. स्वतः अब्जाधीश असल्याने प्रचारासाठी निधीची कमतरता त्यांना भासणार नाही. एक्स, एआय, सोशल मीडिया वापरून नवीन प्रकारचा प्रचार पद्धत ते अवलंबू शकतात. अनेक अमेरिकन नागरिक 'अति-उदारमतवादी' विचारांना कंटाळले आहेत, याचा फायदा त्यांना होऊ शकतो. त्यांच्यासमोर काही अडचणी आहेत, हे नाकारून चालणार नाही. अमेरिकन राजकीय व्यवस्था दुय्यम पक्षांना फारसा वाव देत नाही. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स या दोन पक्षांचे वर्चस्व असल्यामुळे यापूर्वी रोस पेरोट, राल्फ नाडर, जील स्टेन आदी नेत्यांनी स्वतंत्रपणे टक्कर देण्याचा जो प्रयत्न केला, तो फारसा यशस्वी ठरला नाही. विद्यमान अध्यक्ष ट्रम्प व मस्क यांच्यात समानता असूनही, राजकारणात टिकण्यासाठी संघटन, धोरण व प्रादेशिक पकड लागते, ज्याचा अभाव मस्क यांच्याकडे जाणवतो. मस्क यांनी केलेली अनेक वादग्रस्त वक्तव्ये त्यांच्याच विरोधात वापरली जाऊ शकतात. एलॉन मस्क जर खरोखरच राजकीय पक्ष स्थापन करणार असतील, तर तो अल्पकाळ चर्चेचा विषय आणि प्रभावशाली सोशल चळवळ ठरू शकते. मात्र, दीर्घकालीन राजकीय यशासाठी, त्यांना तज्ज्ञ सल्लागार, स्पष्ट धोरणे आणि विस्तृत संघटन याची गरज भासेल. नवा पक्ष कितपत टिकू शकेल, हा पुढचा मुद्दा आहे. हे मस्कच्या कारभार शैलीवर आणि जनतेशी संबंधावर अवलंबून 

असेल.

एलॉन मस्क यांचा संभाव्य राजकीय अजेंडा हा त्यांच्या वैयक्तिक भूमिकांवर, उद्योजकीय धोरणांवर आणि अमेरिकेतील राजकीय वातावरणावर आधारित असेल. मस्क स्वतंत्र अभिव्यक्तीचे कट्टर समर्थक मानले जातात. ट्विटर/एक्स खरेदीनंतर मस्क यांनी विचारस्वातंत्र्याचे कैवारी अशी स्वतःची ओळख जाहीर केली. सोशल मीडियावर नियंत्रण व सेन्सॉरशिपविरोधात त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. डाव्यांची धोरणे त्यांना मान्य नाहीत, असेही दिसून येते. कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ संशोधन, इलेक्ट्रिक वाहने, न्यूरो-तंत्रज्ञान यांना सरकारी पाठिंबा देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. 

नवउद्योजकतेसाठी कर सवलती, सरकारी नियंत्रणविरोधी आर्थिक धोरणे, अत्यंत कमी सरकारी हस्तक्षेप, कमी कर, सुलभ व्यवसाय वातावरण, हरित ऊर्जा क्षेत्रात योगदान, परंतु पर्यावरण धोरणांमध्ये सरकारी सक्तीच्या विरोधात भूमिका अशा काही धोरणात्मक बाबी त्यांनी जनतेसमोर मांडल्या आहेत. कायदेशीर व "कौशल्याधारित" इमिग्रेशनचे समर्थन ते करतात पण अनिर्बंध स्थलांतर व खुले सीमेविरुद्ध त्यांनी भूमिका घेतली आहे. चीन व भारतासारख्या देशांशी तंत्रज्ञानात्मक संबंध वाढविण्यावर भर देणार असल्याचे ते सांगतात. भारतात टेस्ला व स्पेसएक्ससाठी गुंतवणुकीकडे त्यांचा कल आहे; त्यामुळे भारत-अमेरिका तंत्रसहकार्याला त्यांचे समर्थन आहे, असे म्हणता येईल. अमेरिकेत डावे आणि उजवे दोघेही टोकाला गेले आहेत, त्यामुळे मध्यम किंवा तिसरा मार्ग लोकांना आकर्षित करू शकतो. यास्तव एलॉन मस्क यांच्या नव्या राजकीय पक्षाला अमेरिकेत संधी आहे का, याचे उत्तर हो आणि नाही अशा दोन्ही बाजूंनी देता येते. कारण अमेरिकेतील राजकारणात तिसऱ्या पक्षाला टिकणे खूपच अवघड असते, पण एलॉन मस्क हे एक प्रभावशाली, श्रीमंत आणि मीडिया-केंद्रित व्यक्तिमत्व असल्यामुळे काही बाबतीत अपवाद ठरू शकतात. तिसरा पक्ष मतविभाजन करतो, त्यामुळे मतदार त्यांच्याकडे न वळता मुख्य दोन पक्षांमध्येच मत देतात, हा धोका आहेच. तरीही योग्य नियोजन, मध्यमार्गी अजेंडा आणि लोकांचा विश्वास मिळवला, तर हा पक्ष राजकीय वादळ निर्माण करू शकतो.