३,५०० वर्षांपूर्वीचे हरवलेले शहर सापडले !

Story: विश्वरंग |
08th July, 10:29 pm
३,५०० वर्षांपूर्वीचे हरवलेले शहर सापडले !

इंका संस्कृतीचा आणि स्पॅनिश वसाहतवादाचा समावेश असलेला दक्षिण अमेरिकेतील देश म्हणजे पेरू. या देशाला १८२१ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. कोलोनिअल् स्थापत्यकलेचे अतिशय समृद्ध नमुने इथे पहावयास मिळतात. अतिशय विस्तृत असे चौक, रेखिव बाल्कन्या आणि भडक पण शोभणारे रंग अशी येथील वास्तुकलेची काही वैशिष्ट्ये आहेत. याच पेरू देशामधून इतिहास संशोधकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पेरूच्या उत्तर भागातील बारांका प्रांतातील एका टेकडीवर ३,५०० वर्षे जुने ‘पॅनिको’ हे प्राचीन शहर सापडले आहे. संशोधकांनी तब्बल ८ वर्षांच्या उत्खननानंतर या शहराचा शोध लावला आहे. हे शहर कॅरल संस्कृतीशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, हे संशोधन मानवी इतिहासातील एका महत्त्वाच्या कालखंडावर प्रकाश टाकणारे ठरत आहे.

समुद्रसपाटीपासून सुमारे ६०० मीटर उंचीवर असलेल्या टेकाडावर वसलेले हे शहर इ.स.पू. १८०० ते १५०० या काळात अस्तित्वात होते, असे पुरावे समोर आले आहेत. या शहराची खास वैशिष्ट्य म्हणजे त्याची वर्तुळाकार रचना, ज्याच्या मध्यभागी एक महत्त्वाचे केंद्र आहे. या केंद्राभोवती दगड व मातीच्या १८ इमारती सापडल्या असून, त्यात मंदिरे, घरे आणि इतर उपयुक्त रचनांचा समावेश आहे. या रचनेतून शहराचे सामाजिक व धार्मिक महत्त्व स्पष्ट होते.

सुरुवातीच्या अभ्यासानुसार, पॅनिको हे केवळ एक निवासी शहर नव्हते, तर एक समृद्ध व्यापारी केंद्रही होते. पॅसिफिक किनारपट्टीला अँडीज पर्वतरांगांशी आणि अमेझॉनच्या बेसिनशी जोडणारे हे शहर प्राचीन व्यापारी मार्गांवर एक महत्त्वाचे ठिकाण होते. उत्खननात आढळलेली शंखापासून बनवलेली दागिने, मातीच्या मूर्ती व कलेचे नमुने दर्शवतात की या ठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक विधी मोठ्या प्रमाणात होत असत. यावरून हे दिसून येते की पॅनिको हे व्यापार, धर्म, समाज आणि संस्कृती यांचे एकत्रित केंद्र होते, जे त्या काळात अत्यंत विकसित होते.

पॅनिको शहराचे स्थान व त्यातील स्थापत्यशैली ही कॅरल संस्कृतीशी अतिशय साम्य दर्शवते. कॅरल संस्कृती ही दक्षिण अमेरिकेतील सर्वात जुनी व सुपे व्हॅलीमध्ये विकसित झालेली प्राचीन संस्कृती मानली जाते. ती सुमारे ५००० वर्षांपूर्वीची असून, इजिप्त, सुमेर, भारत आणि चीनच्या प्राचीन संस्कृतींच्या समकालीन होती. मात्र, ती या संस्कृतींपासून पूर्णपणे स्वतंत्रपणे विकसित झाली.

- गणेशप्रसाद गोगटे