हृदयविकाराच्या मृत्यूंचे विश्लेषण आवश्यक

गोव्यात हृदयविकाराने गेल्या पाच ते दहा वर्षांत मृत्यू झालेल्या किंवा किमान अभ्यासासाठी म्हणून गेल्या दोन ते तीन वर्षांत मृत्युमुखी पडलेल्या दहा हजार व्यक्तींच्या मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण व्हायला हवे.

Story: संपादकीय |
08th July, 10:46 pm
हृदयविकाराच्या मृत्यूंचे विश्लेषण आवश्यक

समृद्ध, आनंदी जीवन जगण्यात जगभर प्रसिद्ध असलेल्या 'सुशेगाद' गोव्याला विविध आजारांचा विळखा पडत आहे. कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग अशा वेगवेगळ्या भयंकर आजारांचा गोव्यात फैलाव होत आहे. निसर्गसंपन्न, प्रगतीशील आणि पर्यटनात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जात असलेल्या गोव्याला आरोग्याच्या समस्येने ग्रासले आहे. पण हे आजार गोव्यात का बळावले, त्याचा अभ्यास करण्याची तसदी कोणी घेतली नाही. त्यामुळे गोव्याच्या समृद्धीच्या आड लपलेली एक गंभीर आरोग्यविषयक समस्या सध्या डोके वर काढत आहे. यात आघाडीवर आहेत ते हृदयविकाराने वाढत असलेले मृत्यू.

२०१५ ते २०२४ या दहा वर्षांत गोव्यात ४४,१०१ नागरिकांचा मृत्यू केवळ हृदयविकारामुळे झाला आहे. 'गोवन वार्ता'ने 'राज्यात हृदयविकारांमुळे दिवसाला सरासरी बारा जणांचा मृत्यू' या मथळ्याखाली मंगळवारच्या अंकात पहिल्या पानावर ठळकपणे ही बातमी प्रसिद्ध केली आहे. यात गोव्यातील हृदयविकारामुळे होत असलेल्या मृत्यूंबाबत चिंता व्यक्त करून गेल्या दहा वर्षांतील धक्कादायक आकडेवारीही प्रसिद्ध केली आहे. गोव्यातील आरोग्याच्या समस्येत हृदयविकाराचे मृत्यू ही एक गंभीर समस्या आहे. त्यामुळे या एकूणच आजाराविषयी आणि मृत्यूच्या कारणांविषयी संशोधन होण्याची गरज आहे. हे आकडे फार चिंताजनक असून दरमहा सरासरी ३६७ जणांचा हृदयविकाराच्या आजारामुळे किंवा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होतो. डॉ. शेखर साळकर यांनीही याविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते गोव्यातील ही समस्या गंभीर असून मागील पाच वर्षांत हृदयविकाराने मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सदर व्यक्तीला अन्य कोणते आजार होते का, त्याचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे गोव्यात अशा प्रकारचे संशोधन झालेले नाही.

दररोज १२ गोमंतकियांचे प्राण हृदयविकार घेत आहे. कोविडच्या लसीमुळे हृदयविकाराचे आजार आणि हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूंमध्ये वाढ झाल्याचे म्हटले जात होते. तशी चर्चाही होती, मात्र तशा प्रकारची शक्यता नाही, असे अलीकडेच राष्ट्रीय स्तरावरील एका संशोधनात समोर आले आहे. केवळ २०२१ मध्ये हृदयविकारामुळे ५,५६८ मृत्यू नोंदवले गेले. अर्थात या दहा वर्षांमध्ये हा आकडा सर्वाधिक होता. सरासरी एक हजार मृत्यूंची त्या वर्षी वाढ झाली होती. इतर वर्षांची सरासरी पाहिली तरी ती समान आहे असे मानता येईल. त्यामुळे कोविड लसीचा परिणाम मानल्यास तोही समज २०२१ हे वर्ष सोडले तर दूर होतो.  

अनेकदा डॉक्टर मृत्यूचे कारण नोंदवताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू असे देतात. कारण विमा किंवा अन्य गोष्टींसाठी त्याची मदत होते. इतर आजारांचा त्यावर उल्लेख नसतो. इतर आजारांचे अनेक रुग्ण उपचार घेत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू पावतात. मृत्यूच्या वेळी कदाचित हृदयविकाराचे कारण नोंदवले जात असावे, त्यामुळे ही मोठी वाढही दिसत असेल. पण ते समजून घेण्यासाठी गोव्यात हृदयविकाराने गेल्या पाच ते दहा वर्षांत मृत्यू झालेल्या किंवा किमान अभ्यासासाठी म्हणून गेल्या दोन ते तीन वर्षांत मृत्युमुखी पडलेल्या दहा हजार व्यक्तींच्या मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण व्हायला हवे. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण घेणारे किंवा शिक्षण पूर्ण केलेले तसेच वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेणारे आणि संशोधन करणारे विद्यार्थी यांना या कामात सहभागी करून घ्यावे. आवश्यकता भासल्यास तज्ज्ञ डॉक्टर, समाजशास्त्रज्ञ, आहारतज्ज्ञ आणि सामाजिक संस्थांचा संयुक्त अभ्यास गट तयार करावा. गोव्यातील काही वाढत असलेल्या आजारांमागची कारणे, तसेच हृदयविकाराच्या आजाराने किंवा धक्क्याने मृत्यू झालेल्यांच्या आरोग्याची वैद्यकीय पार्श्वभूमी तपासून पाहण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू येणाऱ्यांची संख्या वाढत आहे ते पाहता गोव्यातील जीवनशैली, व्यसन, मानसिक तणाव, आर्थिक स्थितीचा थेट संबंध या गोष्टींकडे येतो. त्यासाठी सरकारनेच पुढाकार घेऊन गोव्यातील हृदयविकाराच्या धक्क्याने किंवा आजाराने झालेल्या मृत्यूंचे विश्लेषण करून अभ्यास अहवाल मागवावा. प्रसंगी त्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी. कारण गोव्यातील हे गंभीर विषय नेमके कसे निर्माण होतात, त्याकडे आताच लक्ष देण्याची गरज आहे. कारण ही काही वैयक्तिक आरोग्याची समस्या राहिलेली नाही, तर संपूर्ण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोरील हे एक गंभीर आव्हान बनले आहे.