भगवद्भक्तीचा आविष्कार घडवणाऱ्या लावण्या या परिसराची समृद्ध परंपरा आहेत आणि त्यातून या परिसराला जो समृद्ध आध्यात्मिक, सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे, त्याचेच पदोपदी दर्शन घडायचे.
सुरेख, नेमक्या आणि आशयघन शब्दांची गुंफण करण्याबरोबर, जेव्हा कलात्मक शब्दांची मांडणी करून, कवनाची निर्मिती होते, तेव्हा लावणीचा जन्म होतो. पूर्वीच्या काळी सर्वसामान्यांच्या मनोरंजनासाठी, त्यांना रुचतील अशा लौकिक, पौराणिक किंवा आध्यात्मिक विषयांवर कडे किंवा ढोलकीसारख्या लोकवाद्यांच्या आधारे लावणीचे गायन केले जायचे. लावण्या बहुतांशी शृंगारिक स्वरुपाच्या असतात, त्यात स्त्रीच्या लावंण्याची रसपूर्ण वर्णने डफ-तुणतुण्यावर सादर करण्याची परंपरा रूढ आहे.
गोव्यात लावणीची आगळीवेगळी परंपरा असून, त्यात मात्र देवदेवतांचे लावंण्य प्रकर्षाने दृष्टीस पडते. शिमग्याच्या मर्दानी लोकोत्सवाच्या प्रसंगी सत्तरी, डिचोली तालुक्यातल्या काही गावात, परमेश्वराच्या लावंण्याचे वर्णन करणाऱ्या लावण्या पूर्वापार गायल्या जातात. सत्तरीतील शिमगोत्सवात, ब्रह्माकरमळीला ब्रह्मदेवाविषयी गायली जाणारी लावणी तेथील लोकमानसाला विशेष प्रिय होती. परंतु गोव्यात लावणी लोकगीतांच्या गायनाची परंपरा कारापूर गावातील, विठ्ठलापुरात शाहीर गोंदजी नाईक यांनी जशी रुजवली, समृद्धीस नेली तशी मात्र अभावाने अन्यत्र अनुभवायला मिळते.
गोंदजी नाईक यांचे कुटुंब कारापूर येथील विठ्ठलापुरात स्थायिक झालेले असले, तरी पूर्वीचे त्यांचे कुटुंब अंत्रुज महालातील शिरोड्यातून स्थलांतरित झाले होते. त्यामुळे गोंदजी नाईकांनी ज्या लावण्या रचल्या, त्यात त्यांचे कुलदैवत असलेल्या शिवनाथांचा जसा उल्लेख आढळतो, तसाच शिरोडावासिनी झालेल्या कामाक्षी देवीचाही उल्लेख आढळतो. 'नमितो मी जोडुनि कर गजानन शिवगौरीचा कुमार' अशा गणपतीच्या लावणीने प्रारंभ होणारे गायन सरस्वतीलाही वंदन करण्यास विसरत नाही. श्रीकृष्ण, अक्रूर, श्रीयाळ राजा, श्रीराम राजा, हरिश्चंद्र, राधाकृष्ण, शिवाची, जानकीची, गोपिकांची रासक्रीडा, कृष्णार्जुन, अनुसूया, ध्रुवबाळ, दत्ताची, नलाची, भिल्लीणीची, शूर्पणखेची, रावणाची, पांडवांची, पुतनेची, विभीषणाची, मंडोदरीची, सत्यरक्षणाची अशा विषयांवर गोंदजींनी ज्या लावण्या रचलेल्या आहेत, त्या प्रासादिक शब्दकळा, भक्तीरस, परमेश्वराविषयीच्या आदरयुक्त भावभावनांनी समृद्ध आहेत.
गोंदजी नाईक शिरोडकर यांचा जन्म, बालपण कारापूर गावातील विठ्ठलापूर येथे झाले. त्यामुळे येथील मारुतीगडावर चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात आगमन झालेल्या श्रीविठ्ठलाने या संपूर्ण परिसराचा भक्तीच्या परिसस्पर्शाने कायापालट घडवला होता. कर्नाटकातील आंबेखोल इथून उगम पावणारी थोरली न्हय 'वाळवंटी' म्हणून ओळखली जाते. पंढरपुरातील श्रीविठ्ठलाच्या भक्तीमुळे महाराष्ट्रात जशी वारकरी संप्रदायाची उज्ज्वल परंपरा निर्माण झाली, तशीच ती परंपरा गोव्यातही होती. पंढरपूरहून वार्धक्याने ग्रस्त झालेल्या भाविकांसाठी पांडुरंग कारापुरात आला. पंढरपुरातून आलेली श्रीविठ्ठल मूर्ती केळ घाटमार्गे कर्नाटकातील कृष्णापुरातून सत्तरीतील करंझोळला आली. करंझोळमध्ये या मूर्तीचे बराच काळ वास्तव्य होते. तेथून मोर्ले आणि नंतर कारापुरातील ज्या जागी ही मूर्ती आली, ती 'पंढरीण' नावाने परिचित आहे. जेथे श्रीविठ्ठलाचे छोटे मंदिर उभे राहिले, त्या श्रीस्थळाची महती गोंदजींनी लावणीत सुरेख रीतीने व्यक्त केलेली आहे.
'पुण्यक्षेत्र पंढरणी देवे।
निर्मियली अरण्यी॥
पूर्वी पांडव असता वनासी।
अडचण येतां स्नानासी॥
भीमे आपटूनिया गदेसी।
फोडोनिया खडकासी।
आणिली भीमावती वर काननी॥
कारापुरातील पंढरणी इथून श्रीविठ्ठलाचे स्थलांतर वाळवंटी नदीच्या उजव्या तिरावर वसलेल्या मारुतीगडावर, साखळी शहराच्या पलीकडे करण्यात आले. गोव्यात मराठी भाषा आणि संस्कृतीची परंपरा महाराष्ट्रासारखीच जुनी आणि समृद्ध होती आणि त्यामुळे शंभर वर्षापासून श्रीविठ्ठल मंदिराच्या स्थापनेपासून, चैत्र पौर्णिमेच्या उत्सवानिमित्त दशावतारी नाटक वीरभद्र, रथोत्सव, भजन पूजनाचे सादरीकरण व्हायचे, त्याचे प्रतिबिंब गोंदजींच्या लावण्यांतून अनुभवायला मिळते. साखळी, पर्ये, कारापूरच्या परिसरात शिमगोत्सवाच्या प्रसंगी येथील नाना जातींमध्ये विखुरलेला कष्टकरी उत्स्फूर्तपणे विठ्ठलाविषयी जी गाणी म्हणतात, त्यांची रचना गोंदजी नाईक यांनी केलेली आहे याची विशेष माहिती नाही. विठ्ठल, राई आणि रखुमाई यांच्यासह विठ्ठलापुरातील मंदिरात स्थानापन्न झालेला आहे. त्याच्या रूपाची मोहिनी अचाट असल्याने, ध्यानीमनी त्याचाच विचार करणाऱ्या गोंदजींच्या मनात ज्या भावभावना जन्माला आल्या, त्यातून सुरेल आणि अर्थपूर्ण गाण्याची निर्मिती झाली. घुमट, कासाळेसारख्या लोकवाद्यांतून निर्माण होणाऱ्या लोकसंगीतावर सादर होणारी लावणी उपस्थितांना विठ्ठलमय करायची.
''श्री पांडुरंग पंढरीहुनी
तो आला साखळीनगरी॥
ये राण्याचे भक्तीकरिता श्रीहरी।
वसे शृंखलापुरी समापर
उभा विठोबा विटेवरी।
उभय अंगी विजनारी शोभली राईरखुमाई बरोबरी॥
गोंदजींनी रचलेल्या या लावण्या अल्पावधीत इतक्या लोकप्रिय ठरल्या की पंचक्रोशीतल्या कष्टकरी समाजाने त्या गातागाता मुखोद्गत केल्या. जुन्या काळी इथे आजच्यासारखी शिक्षणाची परंपरा नव्हती. परंतु घरोघरी भक्तीविजय, हरीविजय यांसारख्या धर्म ग्रंथांच्या वाचनाने, निरुपणाने, त्यांची मने सुसंस्कारित व्हायची. विठ्ठलापुरात राणे सरदेसाईंचे कुटुंब स्थायिक झाले आणि सत्तरी त्याचप्रमाणे अन्यत्र विखुरलेल्या राण्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध जी बंडे केली, त्याची खरी प्रेरणाशक्ती श्रीविठ्ठल असल्याकारणाने, गोंदजींनी श्रीविठ्ठलाबरोबर राण्यांविषयीची कृतज्ञता लावणीतून प्रकट केलेली आहे.
'पराक्रमी बहुभारी झाले
राणे साखळी नगरी॥
प्रथम ते श्रृंगारपुरीचे राजे सूर्यवंशाचे॥
साचे भक्त पंढरीरायाचे।
सत्व, सत्य वचनाचे॥
भावे भजती विठ्ठल श्रीहरि॥
याच लावणीच्या शेवटी गोंदजींनी दीपाजी राणे यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख केलेला आहे.
२६ जानेवारी १८५२ रोजी नाणूसचा किल्ला जिंकून, दीपाजीने पोर्तुगीजांची दाणादाण उडवली. त्या पराक्रमाविषयीचे गौरवोद्गार काढलेले आहेत. गोंदजींनी जी गाणी रचली, त्यांना येथील सर्वसामान्यांनी आत्मसात केले. गोंदजी राम नाईक शिरोडकर यांचा मृत्यू होऊन शंभर वर्षांचा कालखंड लोटलेला असला तरी साखळी शहरातील आणि कारापुरातील विठ्ठलापुरातील दहाजणांच्या शिमगोत्सवात गोंदजींच्या लावण्यांचे गायन हमखास केले जाते ते पारंपरिक लोकगायकांकडूनच. साखळी बाजारपेठेतील सप्तशती भूमका देवीच्या पवित्र मांडावर उभे राहणाऱ्या लोककलाकारांच्या ओठी गोंदजींच्या लावण्या आपसूक यायच्या. आज त्यांचे गायन करण्यासाठी कलाकारांना जुन्या वह्यांचा आधार घ्यावा लागतो. भगवद्भक्तीचा आविष्कार घडवणाऱ्या या लावण्या या परिसराची समृद्ध परंपरा आहेत आणि त्यातून या परिसराला जो समृद्ध आध्यात्मिक, सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे, त्याचेच पदोपदी दर्शन घडायचे.
- प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५