सुपरहिट ठरलेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील नदीच्या पाण्यातून चंदनाच्या लाकडाची तस्करीचा सीन प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेला होता. नदीतून मोठ्या प्रमाणात लाकडे वाहत असल्याचे चित्र केवळ चित्रपटातच पहायला मिळते, सत्यात असे होऊच शकत नाही, असे काही जणांना वाटत असते. मात्र त्यांना साफ चुकीचे ठरवणारी घटना नुकतीच हिमाचल प्रदेशमध्ये घडली. ढगफुटीनंतर झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आले होते. एका नदीच्या पुरातून मोठ्या प्रमाणात लाकडे वाहत आली आणि ती धरणात पोहोचली. हा विषय आता गंभीर झाला असून मुख्यमंत्र्यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश सीआयडीला दिले आहेत. सीआयडीच्या तपासानंतरच या घटनेमागील गूढ उकलणार आहे.
राज्यात २४ जून रोजी कुल्लू येथे चार ठिकाणी ढगफुटी झाली होती. त्यानंतर नदीला आलेल्या पुरातून हजारो टन लाकडे वाहत आली होती. ही लाकडे पंडोह धरणात पोहोचली होती. थिओग येथील काँग्रेसचे आमदार कुलदीप राठोड यांनी या घटनेची योग्य चौकशी करण्याची मागणी केली होती. जंगलाच्या नाशामुळे विनाश होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. तथापि, वन महामंडळाचे अध्यक्ष केहर सिंग खाची यांनी कुलदीप राठोड यांचे विधान चुकीचे असल्याचे म्हटले होते. मात्र आता राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनीही याबाबत वन विभागावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे हा विषय सरकारलाही गांभीर्याने घ्यावा लागला आहे.
ढगफुटीमुळे राज्यात घरे पडणे, प्रापंचिक साहित्य वाहून जाणे आदी घटनांमुळे नागरिकांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सुखू विविध विभागांच्या बैठका घेत आहेत. ज्यांची घरे पूर्णपणे कोसळली आहेत, अशा कुटुंबांना घरे बांधण्यासाठी मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत घेतलेल्या बैठकीत लाकूड वाहून येण्याचा विषय उपस्थित करून सविस्तर चर्चा केली. वाहून आलेल्या लाकडांच्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशीची घोषणाही त्यांनी केली.
हजारो टन लाकडे नेमकी कुणाची? ती कुठून वाहत आली? इतक्या मोठ्या प्रमाणात लाकडे कुणी साठवली होती आणि कशासाठी? असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत. या प्रश्नांची उत्तरे सीआयडीच्या तपासातून मिळतील, अशी अपेक्षा आहे.
- प्रदीप जोशी