काँग्रेससोबत निवडणुकीत युती करून नुकसान करून न घेता किंवा स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा आपचा मनोदय आहे, यात काही गैर नाही. काँग्रेसला सोबत घेऊन काही जागा त्यांना दिल्या आणि काँग्रेसने काही जागा मिळवल्या तर त्यांना सरकारमध्ये स्थान द्यावे लागेल.
भाजपच्या अर्थात एनडीएच्या विरोधात लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या इंडिया गटात फूट पडायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या नादी लागल्याचा परिणाम लोकसभा आणि हरियाणातील निवडणुकीत दिसल्यानंतर तसेच महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्यापासून फारकत घेण्याचे संकेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दिल्यानंतर दिल्लीतही येत्या फेब्रुवारीच्या दरम्यान होणारी विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. दिल्लीत फेब्रुवारीच्या दरम्यान निवडणुका होतील. तिथे आम आदमी पक्षाचे सरकार आहे. सलग दहा वर्षांपासून दिल्लीत आप सत्तेवर आहे. काँग्रेसला तिथे जागा नाही. भाजपकडे अवघेच काही आमदार आहेत. दिल्लीत काँग्रेससोबत जाणे म्हणजे काँग्रेसला काही जागा सोडाव्या लागतील, त्यामुळे सर्व जागांवर आम आदमी पक्षानेच लढावे असे ठरवून आता पक्षाने आपली रणनीती जाहीर केली आहे. उत्तर भारतात काँग्रेसला लोक दूर करत असल्यामुळे पंजाबसारख्या राज्यातही आपने बाजी मारली. काँग्रेसपासून फारकत घेणारे मतदार आपल्याकडे यावेत, असे आपला वाटते. इंडिया गटाचा नीती धर्म म्हणून काहीवेळा काँग्रेसशी सोबत करावी लागली. यावेळी दिल्लीत काँग्रेसला सोबत न घेता स्वबळावर निवडणूक लढवावी असे आपच्या बैठकीत ठरले. त्यानंतर केजरीवाल यांनी रविवारी आपचा निर्णय जाहीर केला. हरियाणानंतर आपने कुठल्याही पक्षासोबत जायचे नाही असे ठरवले होते. त्यानुसार दिल्लीतील निवडणुकीत काँग्रेससोबत न जाता स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असा निर्णय घेतला. 'दिल्लीच्या निवडणुकीत कुठल्याच पक्षासोबत जायचे नाही असे आम्ही ठरवले आहे, त्यामुळे आम आदमी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार,' असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. आम आदमी पक्षाचे दोन राज्यांत सरकार आहे. गोवा, गुजरातमध्येही आपचे काही आमदार आहेत. पक्षाला विस्तार करायचा आहे, त्यामुळे काँग्रेससोबत जाणे आपसाठी धोक्याचे ठरू शकते. काँग्रेससोबत युती करणे म्हणजे आपचेच नुकसान करून घेणे, हे त्यांच्या नेत्यांना कळले असावे. महाराष्ट्रात आणि हरियाणात काँग्रेसला फटका बसला. याच दोन राज्यांत नव्हे तर अनेक राज्यांत काँग्रेसला फटका बसलेला आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या निवडणुकांमध्ये कर्नाटक, तेलंगणा वगळता काँग्रेसला मोठे यश कुठे आलेले नाही. २०२२ मध्ये हिमाचल प्रदेशात काँग्रेसने बाजी मारली होती. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनेही काँग्रेससोबत जाणे टाळले. काही नेत्यांना काँग्रेससोबत जाण्यापेक्षा स्वबळावर निवडणुका लढणे सोयीचे वाटते. भाजप ज्या पद्धतीने प्रचार करत आहे, ते काँग्रेसला सर्वाधिक मारक ठरत आहे. त्यामुळे अशा स्थितीत काँग्रेससोबत जाणे म्हणजे आपले नुकसान करून घेणे हे काही राजकीय पक्षांना कळलेले आहे. लोकसभा निवडणूक आणि राज्याच्या विधानसभेची निवडणूक या दोन्ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्या जाव्यात असेच काही नेत्यांना वाटते. त्यामुळेच दिल्लीत काँग्रेसला सोबत घ्यायचे नाही, असे आम आदमी पक्षाने ठरवले असावे.
दिल्लीत आप विरुद्ध भाजप अशीच लढत गेल्या तीन निवडणुकांमध्ये दिसलेली आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा आप विरुद्ध भाजप अशीच लढत होऊ शकते. काँग्रेसला गेल्या दोन निवडणुकांमध्ये तिथल्या मतदारांनी साफ नाकारले. सलगपणे आम आदमी पार्टी दिल्लीच्या जनतेची पहिली पसंती ठरलेली आहे. दिल्ली काबीज करण्यासाठी भाजपने वेगवेगळे प्रयत्न केले. अनेक नेत्यांना तिथे नेतृत्व करण्यासाठी पुढे करण्यात आले, पण सलगपणे भाजपला तिथे अपयशच येत आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या काही महत्त्वाच्या नेत्यांवर अनेकदा सीबीआय, ईडीची कारवाई झाली तरीही आम आदमी पार्टीने हार मानली नाही. केजरीवाल यांनी आपण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्रिपद सोडून आतिशी मार्लेना यांना मुख्यमंत्रिपदावर नियुक्त केले. जनतेत जाऊन पुन्हा निवडून येऊनच मुख्यमंत्री होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे एक सहानुभूती त्यांच्यासोबत असेलच. काँग्रेससोबत निवडणुकीत युती करून नुकसान करून न घेता किंवा स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा त्यांचा मनोदय आहे, यात काही गैर नाही. काँग्रेसला सोबत घेऊन काही जागा त्यांना दिल्या आणि काँग्रेसने काही जागा मिळवल्या तर त्यांना सरकारमध्ये स्थान द्यावे लागेल. त्यापेक्षा स्वबळावर निवडणूक लढवण्यातच शहाणपण आहे. प्रसंग आला आणि काँग्रेसची गरज लागली तर निकालानंतरही अनेक घडामोडी होऊ शकतात.