दिवज हा सुद्धा एक प्रकारचा दिवा असून, वर्ष पद्धतीनुसार त्याला देवस्थानांच्या दिवजाच्या जत्रेत अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. आपल्या पतीला सुखसमृद्धीयुक्त जीवन लाभावे म्हणून ग्रामदेवीकडे सुवासिनी साकडे घालतात.
भारतीय संस्कृती ही सनातन काळापासून प्रकाशपूजक असून, सुवासिनींमार्फत वार्षिक जत्रोत्सवात प्रज्वलित केले जाणारे दिवज हे या प्रदेशाचे सांस्कृतिक संचित आहे. पाच वातींचे दिवज हे जणुकाही मानवी जीवनाच्या धर्म, काम, मोक्ष आणि अर्थ आदी चार महत्त्वपूर्ण उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्त्रियांना जागृत करत असते. गोव्यातील बाराजणात एकेकाळी लोहार, न्हावी आदींचा समावेश व्हायचा तसेच मातीकामाशी पूर्वांपार संबंधित असणाऱ्या कुंभाराचा समावेश असायचा. प्रारंभी वेगवेगळ्या आकारातल्या कुंभांची निर्मिती करणाऱ्या या कारागिरांनी कालांतराने मातीच्या नानाविविध कलाकृतींना समूर्त करण्याचे कौशल्य साध्य केले. सुरुवातीला दगडांचे तसेच शिंपल्यांचे दिवे वापरणाऱ्या मानवाला मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या दिव्यांचा समर्थ पर्याय प्राप्त झाला. कालांतराने मातीपासून नाना तऱ्हेचे दिवे समूर्त करण्याच्या कलेत ज्यांनी प्राविण्य मिळवले, त्यांना कुंभार ही संज्ञा लाभली. भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असणाऱ्या गोमंतकीय संस्कृतीवर जेव्हा सोळाव्या शतकात पोर्तुगीज धर्मांधांनी आरंभलेल्या धर्म समीक्षणाचे आक्रमण झाले आणि हिंदूंच्या प्रथा, परंपरांना प्रतिबंध करणारे कायदे संमत केले, तेव्हा मोठ्या श्रद्धेने जतन केलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक संचितावर संकटे निर्माण झाली. परंतु असे असताना गोमंतकीयांनी जुन्या काबिजादीत जेव्हा मंदिरे उद्ध्वस्त होणार असल्याची जाणिव निर्माण झाली, तेव्हा मोठ्या शिताफीने त्यांनी आपल्या ग्रामदैवतांचे नव्या काबिजादीत स्थलांतर केले आणि जत्रा, उत्सवांचे सत्र नव्याने आरंभले. त्यामुळे कार्तिकातल्या काळ्याकुट्ट रात्रींना उजळून टाकणारा दिवजांचा उत्सव प्रतिकुल परिस्थितीशी तोंड देऊन संपन्न होऊ लागला. दिवजांचा उत्सव सुवासिनी स्त्रियांबरोबर काही ठिकाणी कुमारिकांशी संबंधित असल्याने, त्यांचाही सहभाग त्यात होऊ लागला. गावडोंगरीत गुढीपाडव्याच्या पर्वदिनी पुरुष मंडळी दिव्याच्या जत्रेत सहभागी होतात. येथील मलकाजाणाच्या मंदिराला मिरवणुकीत प्रदक्षिणा दिण्याची काठी धारण करून घातल्याशिवाय आदिवासी वेळिप समाजाच्या वयात आलेल्या तरुणांना लग्नाच्या बंधनात अडकता येत नाही. त्याचप्रमाणे रजःस्वला झालेल्या कुमारिकांना दिवज धारण करून मलकाजाणाला प्रदक्षिणा घातल्यानंतरच लग्नाची अनुमती लाभते. पूर्वीच्या काळी अशा कुमारिकांना मामा शृंगाराचे साहित्य द्यायचा आणि वयात आलेल्या भाचीला खांद्यावर बसवून दिवजांच्या मिरवणुकीत सहभागी व्हायचा. डिचोलीतील सर्वण गावातील ग्रामदेवी सातेरीचे मंदिर पूर्वीच्या काळी सुरंगीच्या सदाहरित वृक्षांनी समृद्ध असलेल्या देवराईत वसले होते. मृण्मयी वारुळाच्या रूपात पुजल्या जाणाऱ्या सातेरीच्या सान्निध्यात घनदाट अशा राईत सुवासिनींनी प्रज्वलित केलेल्या दिवजांचा प्रकाश उजळून टाकायचा.
पूर्वीच्या काळी स्त्रियांच्या एकंदर वागण्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी येण्या-जाण्यावर तत्कालीन समाजाने बरेच प्रतिबंध घातले होते. त्यामुळे कार्तिकात किंवा वार्षिक तिथी दिवशी नियोजित केलेल्या दिवजोत्सवात सहभागी होण्यास सुवासिनींना विलक्षण ओढ लागलेली असायची. प्रबोधिनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा तुळशी वृंदावनाचा पारंपरिक विवाह सोहळा संपन्न झाला की दिवजांच्या जत्रेचे सुवासिनींना वेध लागतात. त्यामुळे साजशृंगार करून मातीचे किंवा धातूचे दिवज धारण करून सुवासिनी दिवजोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. कार्तिक महिन्यात खरेतर मान्सूनच्या पावसाने निरोप घेतल्याकारणाने आकाश निरभ्र झालेले असते आणि अशा आकाशात संध्याकाळी सूर्यास्तानंतर कृत्तिका हा तारकापुंज दिसू लागतो. कार्तिकातील पौर्णिमा कातयाची पूनव म्हणून खरेतर नक्षत्रांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी करण्याची परंपरा असून, त्यानंतर गोव्यात ठिकठिकाणी दिवजोत्सवाची पूर्वतयारी सुरू होते. बऱ्याच ठिकाणी कार्तिकातील अमावस्येला अंधाऱ्या रात्रीला प्रकाशाने उजळून टाकणारा सुवासिनींचा दिवजोत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न होतो. शरद - हेमंत ऋतूंच्या संगम प्रसंगी दिवजोत्सव संपन्न होत असतो, त्यावेळी कडाक्याची थंडी असते. परंतु हाती दिवज धारण केलेली सुवासिनी या उत्सवात सहभागी होण्यासाठी इतकी उत्सुक झालेली असते की, तिला थंडीची पर्वाच नसते. दिवजाच्या प्रकाशामुळे तिला जणुकाही ऊर्जा लाभते आणि भारावल्यागत नऊवारी साडी, केसात मोसमी फुलांचे गजरे आणि घरातले आपले परंपरिक सुवर्णालंकार परिधान करून ती सहभागी होते. डिचोलीतील अडवलपाल येथील शर्वाणीदेवी ही बार्देशातील साळगावची ग्रामदेवी. पोर्तुगीज अमदानीत ही देवी अडवलपाल गावी आली आणि इथल्या लोकमानसासाठी ऊर्जाशक्ती झाली. गोवाभर विखुरलेल्या साळगावकर मंडळीच्या सुवासिनी अडवलपाल येथे संपन्न होणाऱ्या दिवजोत्सवात सहभागी होण्यासाठी येतात. मंगल वाद्याच्या निनादात देवीच्या उत्सवमूर्तीसमवेत संपन्न होणारा दिवजोत्सव प्रेक्षणीय आसाच असतो. फोंडा तालुक्यातील कुंकळ्ये येथील शांतादुर्गेच्या रथोत्सवाच्या सान्निध्यात इथला दिवजोत्सव संपन्न होतो. आज आधुनिकीकरणाच्या लाटेत बऱ्याच गोष्टी बदलल्या असल्या तरी पूर्वापार चालत आलेल्या रितीरिवाज, परंपरांचे पालन करत दिवजांचा उत्सव इथल्या सुवासिनींना प्रकाश, तेजाची पूजा करण्यासाठी प्रवृत्त करत आहे.
आपली संस्कृती प्रकाशपूजनाची असून, प्रकाश निर्माण करणाऱ्या दिव्याला त्यामुळे गोव्यातल्या धर्म-संस्कृतीने विशेष महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. त्यामुळे तऱ्हेतऱ्हेच्या दिव्यांना उत्सवानुसार पूजेत स्थान बहाल केलेले आहे. दिवज हा सुद्धा एक प्रकारचा दिवा असून, वर्ष पद्धतीनुसार त्याला देवस्थानांच्या दिवजाच्या जत्रेत अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. आपल्या पतीला सुखसमृद्धीयुक्त जीवन लाभावे म्हणून ग्रामदेवीकडे सुवासिनी साकडे घालतात. पेडणेत पालये गावात पाच दिवजांना परंपरेनुसार जत्रेत स्थान लाभलेले असून, व्रतस्थ सुवासिनी दिवजाच्या जत्रेत पेटलेल्या निखाऱ्यांनी प्रतिकात्मक आंघोळ घालण्याची प्रथा पहायला मिळते. पेडणे ते काणकोणपर्यंत गोव्यातील विविध गावांत दिवजांची जत्रा साजरी केली जात असली तरी त्यातून इथल्या सुवासिनींच्या वैविध्यपूर्ण परंपरांच्या पैलूचा साक्षात्कार अनुभवायला मिळतो. दिवजांच्या जत्रेची ही परंपरा गोवा - कोकणातील कष्टकरी सुवासिनींचे एकात्मतेचे आणि प्रकाशपूजनाचे अनुबंध दाखवते.
- प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५