सच्चिदानंद! म्हणजे सत् चित् आनंद! तो कधीच मरत नाही! ठेवा ती तिरडी खाली!! ती तिरडी सोडायला लावून ज्ञानेश्वरांनी त्या प्रेतावरून हात फिरवला व म्हणाले, सच्चिदानंद बाबा, चला उठा. त्याबरोबर सच्चिदानंद बाबा उठून बसले!
अर्जुना, तसे विचार करून पाहिले तर घटातील आकाश व घटाबाहेरील आकाश हे एकच असते. घटाचा आकार मोडला तरी व न मोडला तरीही ते एकच असते. त्याचप्रमाणे ज्याला सोsहं सिद्धतेने 'अहं ब्रह्मास्मि' हा बोध होतो, त्या सिद्धयोग्याला (एरवी बहुतेकांना देहपतनापश्चात पडणारे) मार्ग-अमार्ग यांचे बिकट संकट कधीही भेडसावत नाही. म्हणून तू योगयुक्त व्हावेस. तसे झाले की मग अखंडित ब्रह्मस्वरूपता प्राप्त होते. ती प्राप्त झाली की मग हा देह कधीही कुठेही पडला किंवा न पडला किंवा जसाच्या तसा राहिला, तरीही अशा योग्याची नित्य ब्रह्मस्थिती कल्पातीही बिघडत नाही. त्याला कल्पारंभी जनन बाधत नाही वा कल्पान्ती मरणही येत नाही! आणि यांच्यामध्ये असणारी स्वर्गाची वा संसाराची अवस्था देखील त्याला भुलवू शकत नाही.
कोणत्याही प्राप्त स्थितीत तो ब्रह्मस्वरुपी निश्चल असतो. तो असा जाणकार योगी होतो की या ज्ञानाची सरलता, याचा सहजसाध्य सोपेपणा हा फक्त त्यालाच माहीत असतो. कारण तो सर्व भोग ओलांडून त्यांच्या पलिकडे जाऊन ब्रह्म होऊन राहिलेला असतो.
इतकेच काय, पण दानव, मानव व इंद्रादी देवांना सुद्धा 'सर्वस्व' वाटणारे जे स्वर्गाचे सुख, ते सुद्धा अशा योग्याला य:कश्चित् वाटते! तेही त्याज्य व तुच्छ लेखून तो सहज सर्वथा दूर लोटतो!
वेदेषु यज्ञेषु तप:सु चैव
दानेषु यत्पुण्य फलप्रदिष्टम् ।
अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा
योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ।।२८।।
सरळ अर्थ : कारण योगी पुरुष या रहस्याला तत्वतः जाणून वेदाध्ययनात व यज्ञ, तप व दानादी करण्यात जे पुण्यफल सांगितले आहे त्या सर्वांला नि:संदेह उल्लंचन करून जातो आणि सनातन परम पद पावतो.
विस्तृत विवेचन : अहो असे आहे की रात्रंदिवस चारही वेद कितीही घोकून आणि यज्ञस्वरूप शेत पिकवून किंवा महत्तप आणि भरपूर दान करून अपरिमित पुण्य संपादन केले आणि त्या महत्पुण्याचा मळा बहरून जरी परिपूर्ण असा फळाला आला, तरी त्यातून जे सुख प्राप्त होण्यासारखे आहे, त्याची नित्य शुद्ध ब्रह्मस्वरूपाच्या सुखाशी तुलना कशी होऊ शकेल?
बरे, ज्याच्या प्राप्तीसाठी वेदांमध्ये यज्ञांसारखी विविध साधने सांगितलेली आहेत, पण शेकडो यज्ञ करून सुद्धा जे प्राप्त होणे कठीण असते, जे प्राप्त होण्यासाठी पूर्वजन्मीच्या पुण्य कर्मांचा आधार पाठीशी असावा लागतो, असे भोक्त्याचे मनोरथ पूर्ण करणाऱ्या त्या अवीट अशा स्वर्ग-सुखाला देखील कौतुकाने आपल्या हातावर तोलून बघितल्यावर योगीश्वराला ते ब्रह्म-सारुप्य-सुखापुढे गौण वाटते! त्या स्वर्ग-सुखाची पायरी करून तो योगीराज ब्रह्मसिंहासनावर जाऊन बसतो! असे जो ब्रह्मदेव व महादेव श्रीशंकर यांचा पूज्यदेव आहे, जो योग्यांनी भोगण्याजोगे भोग-धन आहे, जो सकल विश्वाच्या जीवाचे जीवन आहे, जो सगळ्या कलांची कला आहे, जो ज्ञानांची जीवनकला आहे, असा तो यादवांच्या कुळाला उजळवणारा स्वानंदाचा ओतीव पुतळा सर्वज्ञ श्रीपती यादवेंद्र कृष्ण कुन्तीपुत्र अर्जुनाला सांगता झाला.
इथे श्रीमद्भगवद्गीतेचा आठवा
अध्याय पूर्ण झाला.
कुरुक्षेत्रावर जे जे घडलेले संजयाने धृतराष्ट्राला सांगितले असे संस्कृत गीतेत म्हटलेय, ते ते सर्व नेवासे येथील देवळात आलेल्या श्रोतेजनांना संत मानून त्यांना सोळा वर्षांचे श्रीज्ञानदेव आपल्या थोरल्या बंधूस्वरूप गुरुदेवांच्या (श्री निवृत्तीनाथांच्या) आज्ञेनुसार त्यांच्यासमोरच मायबोली मराठीतून सांगतायत् आणि श्री सच्चिदानंदबाबा त्याचवेळी तिथेच बाजूला बसून ते सगळे निरुपण लिहून घेत आहेत, असा तो श्रीज्ञानेश्वरी ग्रंथनिर्मितीचा प्रसंग आहे. त्यातील श्री सच्चिदानंदबाबांची कहाणी खरोखर जाणून घेण्यासारखी आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई ही भावंडे श्रीत्र्यंबकेश्वर व ब्रह्मगिरी यात्रा करून परतताना मजल दरमजल करत जेव्हा नेवासे गावात प्रवेश करती झाली, तेव्हा त्यांच्या समोरून दुसऱ्या बाजूने एक मिरवणूक आली. ती प्रेतयात्रा होती. या चौघा मुलांचे तेज बघून त्यातली एक बाई लगबगीने पुढे आली व तिने या मुलांना वाकून नमस्कार केला. अनायासे श्रीनिवृत्तिनाथ व श्री ज्ञानेश्वरांच्या मुखकमलातून "अखंड सौभाग्यवती भव" असे आशीर्वचन निघाले. तेव्हा त्या बाईने चमकून वर बघत सांगितले की तिचे यजमान नाहीत! निवृत्तिनाथांनी विचारले, कुठे आहेत ते? तेव्हा तिने त्या प्रेतयात्रेतल्या तिरडीकडे बोट दाखवले.
काय नाव आहे त्यांचे?
सच्चिदानंद!
अरे, म्हणजे सत् चित् आनंद! तो कधीच मरत नाही! ठेवा ती तिरडी खाली!! ज्ञानदेवा, जागा कर त्याला जरा!!! ती तिरडी सोडायला लावून ज्ञानेश्वरांनी त्या प्रेतावरून हात फिरवला व म्हणाले सच्चिदानंद बाबा, चला, उठा. आणि काय आश्चर्य! सच्चिदानंद बाबांनी डोळे उघडले! ते उठून बसले! त्यांनी चौघा भावंडांना नमस्कार केला व त्यानंतर आपल्या बायकोला म्हणाले की, मी आता यापुढे या चौघांबरोबरच राहीन!
ते हे सच्चिदानंद बाबा. त्यांनी ज्ञानेश्वरांनी निवेदन केलेली भावार्थदीपिका त्या त्या वेळी प्रत्यक्ष तिथे बसून लिहिली. असे "आजची ज्ञानेश्वरी" हा प्रसादिक ग्रंथ लिहिणारे पिंपरी - चिंचवड येथील साम्प्रत साधक त्र्यंबक चव्हाण यांनी त्यांच्या ग्रंथात नमूद केले आहे.
मुळातच श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. ही भाषा जनसामान्यांना कळत नाही. अशा या ग्रंथाचे अंतरंग मराठी भाषिकांना कळावे म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ती "भावार्थदीपिका" या ओवीबद्ध मराठी ग्रंथात आणली. पण ती तेराव्या शतकातील मराठी. त्यातले बरेचसे शब्द व वाक्यप्रयोग आताच्या मराठीत प्रचलित नसल्याने वाचकांना कळत नाहीत. परिणामी अर्थबोधात गोंधळ होतो. तसा तो होऊ नये म्हणून पेशाने वनअधिकारी असलेल्या त्र्यंबक चव्हाण यांनी त्या ओव्यांमधील कठीण शब्दांच्या जागी त्याच अर्थाचे आजच्या मराठीतले सरळ व सुलभ असे सोपे शब्द घालून "आजची ज्ञानेश्वरी" या ग्रंथाची निर्मिती केली. या ग्रंथाला सुपर कॉम्प्यूटर निर्माते सुप्रसिद्ध विजय भटकर यांची ओघवती प्रस्तावना आहे. सदर ग्रंथात भगवद्गीतेतले मूळ संस्कृत श्लोक, त्यांच्यावरील ज्ञानेश्वरीतील मूळ ओव्या व त्याच पण आजच्या मराठीतल्या सोप्या शब्दातील नव्याने लिहिलेल्या ओव्या, अशी छपाई आहे. त्यामुळे हा ग्रंथ वाचताना भगवद्गीतेचा अर्थ समजणे पहिल्यापेक्षा जरा जास्त सोपे होते.
- मिलिंद कारखानीस
(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)
मो. ९४२३८८९७६३