जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा सापडला आहे. यात १ हजार टन उच्च गुणवत्तेचे सोने असल्याचा अंदाज आहे. या खाणीची किंमत सुमारे ७ लाख कोटी रुपये अंदाजित वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच, भारताच्या जीडीपीपेक्षा जास्त या सोन्याच्या खाणीची किंमत आहे. हा जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सोन्याचा साठा मानला जातो.
सोन्याच्या या नव्या खाणीच्या शोधाचा चीनच्या सोने उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या चीन जागतिक पातळीवर सोन्याच्या उत्पादनात आघाडीवर आहे. एकूण उत्पादनात चीनचे दहा टक्के वाटा आहे. जगातील सोन्याच्या बाजारपेठेत चीनचा दबदबा असून २०२४ मध्ये चीनकडे दोन हजार टनांपेक्षा जास्त सोन्याचा साठा असल्याचे मानले जात होते. सध्या सोन्याच्या किंमतीतही वाढ झाली असून आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्याची जागतिक मागणी वाढत आहे.
सिन्हुआ न्यूजनुसार, हुनानच्या पिंग्झियांग काउंटीमध्ये एक हजार मेट्रिक टन उच्च दर्जाचे सोने असू शकते. त्याची किंमत ८३ अब्ज डॉलर्स (७ लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.
तज्ज्ञ चेन रुलिन म्हणतात की, अनेक छिद्रित खडकांच्या गाभ्यामध्ये सोने स्पष्टपणे दिसत आहे. कोर नमुने दर्शवतात की १ मेट्रिक टन धातूमध्ये १३८ ग्रॅम (सुमारे ५ औंस) सोने असू शकते.
एका अहवालानुसार, पिंगजियांग काउंटीमध्ये ४० हून अधिक सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. येथे ३०० मेट्रिक टन सोने असल्याचा अंदाज भूवैज्ञानिकांनी पूर्वी व्यक्त केला होता. तथापि, नंतर ३-डी मॉडेलिंग वापरल्यानंतर असे आढळून आले की सोन्याच्या विवरांची खोली ३ हजार मीटरपर्यंत आहे. यामध्ये अंदाजे ७०० मेट्रिक टनपेक्षा जास्त सोने आहे.
चिनी अधिकारी येथे अधिक संशोधन करत आहेत. याचा शोध लावणाऱ्या हुनान गोल्ड कॉर्पोरेशनचे म्हणणे आहे की, प्रचंड खोलीमुळे खाणीत किती सोने आहे हे कळू शकले नाही. यामुळे अजून किंमत सांगता येणार नाही.
एखाद्या देशाचे चलन आंतरराष्ट्रीय स्तरावर कमकुवत झाल्यास, सोन्याचा साठा त्या देशाची क्रयशक्ती आणि आर्थिक स्थिरता राखण्यास मदत करतो.
- गणेशप्रसाद गोगटे