महाराष्ट्र व गोवा यांचे नाते वा संबंध पूर्वापार आहेत. महाराष्ट्र हे गोव्याचे शेजारील राज्य. केंद्रात सध्या महाराष्ट्राचे नितीन गडकरी हे रस्ते व महामार्ग मंत्री आहेत. अटल सेतू असो वा जुवारी नदीवरील पूल असो, गोव्याच्या विकासात गडकरी यांचे मोठे सहकार्य गोव्याला लाभलेले आहे. रस्ते, पूल वा पायाभूत सुविधांच्या उभारणीत केंद्राकडून गोव्याला भरीव निधी मिळालेला आहे. गडकरी यांच्या वरदहस्तामुळेच हा निधी मिळालेला आहे.
गोवा हे जागतिक स्तरावरील पर्यटन स्थळ आहे. चित्रपट महोत्सव, खेलो इंडिया स्पर्धा यामुळे गोव्याचा लौकिक दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती लोकसंख्या तसेच वाहनांचा वाढता ताण सहन करण्याची क्षमता असलेले रस्ते असायला हवेत.
अटल सेतुमुळे पणजीतील वाहतुकीची कोंडी बऱ्याच प्रमाणात कमी झाली. जुवारी नदीवरील चौपदरी पुलामुळे पणजी ते मडगाव वा पणजी ते वास्को मार्गावरील वाहतुकीचा वेग वाढला आहे. पर्वरी उड्डाण पुलाचे कामही जोरात सुरू आहे. डबल इंजीन सरकारच्या कार्यकाळात पायाभूत सुविधांच्या उभारणीसह रस्त्यांचे रुंदीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आताच गडकरी यांनी काणकोण बायपास रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १,३७६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे मडगाव, कुंकळ्ळी व काणकोण ही शहरे जोडली जाणार आहेत. या चौपदरीकरणामुळे काणकोण व मडगाव दरम्यानचा प्रवास आणखी सुलभ होणार आहे.
अपघातांसह वाहतुकीची कोंडी कमी करणे हे सध्या सरकारसमोर एक आव्हान आहे. पणजी, वास्को, मडगाव ही प्रमुख शहरे सोडाच सकाळी व सायंकाळी साखळी, डिचोली, फोंडा, म्हापसा, वाळपई या शहरातही वाहतुकीची कोंडी होते. यामुळे नियोजित स्थळी पोचण्यास उशीर होतो तसेच अपघातांची संख्याही वाढत आहे. अपघात तसेच वाहतुकीची कोंडी होण्याची अनेक कारणे आहेत. अरुंद वा अपुरे रस्ते हे एक कारण आहे. रस्त्यांचे रुंदीकरण वा चौपदरीकरण वेगाने सुरू आहे. चौपदरीकरण वा रुंदीकरण करताना सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष होता कामा नये. यासाठी राज्य सरकार वा स्थानिक लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करायला हवा.
रस्ते रुंद झाल्यानंतर वाहनांचा वेग वाढून अपघात वाढण्याचाही धोका असतो. असे होता कामा नये. रस्त्यांचे रुंदीकरण वा चौपदरीकरण हा अपघात नियंत्रणासाठी पूरक ठरायला हवेत.
- गणेश जावडेकर