राजकारणात आश्चर्यकारक निर्णय घेत संपूर्ण राजकीय गणिते बदलण्यात वाकबगार असलेले भाजपश्रेष्ठी गोव्यातील मंत्रिमंडळ फेरबदलासंदर्भात कधी आणि कसा निर्णय घेणार? यात कुणाकुणाला लॉटरी लागणार? याची उत्तरे पुढील काहीच महिन्यांत मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील गत विधानसभा निवडणुकीत भाजपने ४० पैकी २० जागा जिंकल्या. स्पष्ट बहुमतास अवघी एक जागा भाजपला कमी पडली. पण, तीन अपक्ष आमदारांसह मगो पक्षाच्या दोन आमदारांनीही भाजपला साथ दिली. अशा पद्धतीने २५ आमदारांना सोबत घेऊन भाजपने सलग तिसऱ्यांदा राज्यात सरकार स्थापन केले, मंत्रिमंडळाची स्थापना झाली, या मंत्रिमंडळाने राज्याचा कारभार पुढे नेण्यास सुरुवात केली, तोच अवघ्या सहा महिन्यांत काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केला. या आठ आमदारांनी भाजपचा रस्ता का धरला? कुणाकुणाला मंत्री व्हायचे आहे? कुणाला पुढची निवडणूक भाजपच्या उमेदवारीवर लढायची आहे? भाजपात प्रवेश केल्यानंतर मिळालेली महामंडळे आणि संस्थांवर किती जण खूश आहेत? आणि मंत्रिमंडळ फेरबदल होऊन त्यात आपल्याला संधी मिळावी, अशी इच्छा किती जणांची आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे गोमंतकीय जनतेला गेल्या दोन वर्षांत बऱ्याच प्रमाणात मिळालेली आहेत.
काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा सुरू झाल्या. काँग्रेसमधून आलेल्या किमान तीन आमदारांना तत्काळ मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असे अनेकांना वाटत होते. पण, भाजपश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लोकसभा निवडणूक येईपर्यंत मंत्रिमंडळ फेरबदलाकडे जाणीवपूर्वक काणाडोळा केला. लोकसभा निवडणूक तोंडावर येताच दक्षिण गोव्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन नीलेश काब्राल यांची मंत्रिमंडळातून बाजूला करीत त्यांच्याजागी आलेक्स सिक्वेरांची नेमणूक करण्यात आली. या निर्णयाचा लोकसभा निवडणुकीत भाजपला किती आणि कसा फायदा झाला, हे भाजपलाच माहीत. पण, त्यानंतर मात्र सभापती रमेश तवडकर आणि काँग्रेसमधून भाजपात आलेल्या दिगंबर कामत, मायकल लोबो आणि संकल्प आमोणकर या चार नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची खात्री वाटली. भाजपश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत लवकरात लवकर मंत्रिमंडळ फेरबदलाचा निर्णय घेतील आणि आपल्याला मंत्री बनण्याची संधी मिळेल, असे या चारही आमदारांना अनेक महिन्यांपासून वाटत आहे. दोनवेळा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाचे स्पष्ट संकेत दिले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. पण, अलिकडे या दोघांनीही या विषयावर मौनव्रत धारण केल्यामुळे कामत, तवडकर, लोबो आणि आमोणकर या चारही आमदारांमध्ये कमालीची निराशा पसरलेली आहे.
राज्य मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास दोन आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवून त्यांच्याजागी दोन आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भाजपने लोकसभा निवडणुकीनंतर मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावाही घेतलेला आहे. पण, विद्यमान मंत्रिमंडळातील कोणत्या दोन मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा आणि त्यांच्या जागी नेमकी कुणाची वर्णी लावावी, याबाबत मुख्यमंत्र्यांनी अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. किंबहुना भाजप श्रेष्ठींनीही यासाठी ‘ग्रीन सिग्नल’ दिलेला नाही. त्यामुळेच मंत्रिमंडळ फेरबदलासह खात्यांमधील बदलाचेही घोडे अडून बसलेले आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांची कामगिरी अतिशय निराशाजनक अशीच आहे. मंत्र्यांनी लोकांपर्यंत पोहोचावे, त्यांच्या समस्या ऐकाव्या, त्यावर तत्काळ मात करावी, यासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गेल्या काही महिन्यांत अनेक उपक्रम सुरू केले. पण, हे उपक्रम काहीच दिवसांत गुंडाळले गेले. त्यामुळे जे मंत्री खरोखरच आपापल्या खात्यांना योग्य न्याय देत नाहीत, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा आणि त्यांच्याजागी सक्षम आमदाराची नियुक्ती करण्यात यावी, अशी इच्छा सर्वसामान्य जनतेची आहे. राज्याच्या विकासाची गती आणखी वाढवण्यासाठी कर्तव्यात कसूर करणाऱ्या मंत्र्यांना दूर करून त्यांच्याजागी नव्यांची नेमणूक करण्याचा निर्णय भाजपला लवकरात लवकर घ्यावा लागेल.
एकंदरीत, मंत्रिपदासाठी सध्या चार नेते गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. या चौघांपैकी तिघांना मंत्रिपद आपल्यालाच मिळेल, याची निश्चित खात्री आहे. पण, राजकारणात आश्चर्यकारक निर्णय घेत संपूर्ण राजकीय गणिते बदलण्यात वाकबगार असलेले भाजपश्रेष्ठी गोव्यातील मंत्रिमंडळ फेरबदलासंदर्भात कधी आणि कसा निर्णय घेणार? यात कुणाकुणाला लॉटरी लागणार? याची उत्तरे पुढील काहीच महिन्यांत मिळण्याची शक्यता आहे.