काँग्रेसला विश्वास संपादनाची गरज

महाराष्ट्राच्या निकालातून काँग्रेसने जनतेच्या जवळ जाण्यासाठी जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी आपल्या आणि मित्रपक्षांची सत्ता असलेल्या राज्यांना विकासाचे मॉडेल राज्य म्हणून पुढे आणावे लागेल, तरच भविष्यात काँग्रेसला चांगले दिवस येऊ शकतात.

Story: संपादकीय |
29th November, 12:27 am
काँग्रेसला विश्वास संपादनाची गरज

काँग्रेसने निवडणुका गांभीर्याने घेण्याचेच सोडून दिले आहे की काय, असे वाटू लागेल अशी स्थिती सर्वत्र आहे. नेत्यांचे पक्षाकडे झालेले दुर्लक्ष, त्यांचे बदललेले प्राधान्यक्रम आणि थोडे जरी कुठे यश मिळाले तर त्या यशामध्ये हुरळून जाऊन अपयशाकडे दुर्लक्ष करणे अशा विचित्र परिस्थितीत काँग्रेस अडकलेली आहे. हा एक चक्रव्यूह आहे, जो तोडणे काँग्रेसला शक्य होत नाही. अनेक राज्यांमध्ये काँग्रेस अशा चक्रव्यूहात गुरफटून गेली आहे. राज्यापेक्षा एक खासदार जिंकला तर त्या विजयाने काँग्रेसचे पाय जमिनीला टेकत नाहीत. या वागणुकीमुळे आणि पक्षातील या बदलांमुळे परिपक्व राजकारणापासून काँग्रेस  कोसो मैल दूर असल्याचेच जाणवते. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरयाणा, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांतील निवडणुकांमध्ये काय झाले त्यापेक्षा काँग्रेसला पोटनिवडणुकीत एखादा खासदार जिंकला तर आकाश ठेंगणे वाटू लागले. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश अशी काही अवघीच राज्ये आणि झारखंड, जम्मू काश्मीरमध्ये मित्रपक्षांसोबत असलेला सरकारमधील वाटा इतकेच काय ते काँग्रेसकडे आहे. दिल्ली, पंजाब आपकडे, पश्चिम बंगाल तृणमूलकडे, केरळमध्ये एलडीएफ, तामिळनाडूत डीएमके बाकी सर्व ठिकाणी भाजप किंवा एनडीएचे सरकार आहे. कधीकाळी भाजपची ही स्थिती होती. आज चित्र नेमके उलटे आहे किंवा त्याहीपेक्षा खराब आहे. पण याचे सोयरसुतक काँग्रेसला आहे असे दिसत नाही. भाजपने उद्योजकांपासून ते साध्या व्यापाऱ्यापर्यंत सर्वांसोबत आपले सूत जमवले आहे. 

काँग्रेसची जशी राज्यांमध्ये दाणादाण उडत आहे, तशीच काँग्रेसची आर्थिक स्थितीही खराब होत आहे. सोशल मीडियावर काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या समर्थनात 'कथित विचारवंतांचे' पोस्ट पाहून काँग्रेस भारावून जाते. सोशल मीडियावरच्या पोस्टने निवडणूक जिंकता येत नाही, याचे भान काँग्रेसला नाही. कदाचित कुठल्यातरी आयटी सेलचेच लोक काँग्रेसला चण्याच्या झाडावर चढवण्यासाठी सोशल मीडियावर काँग्रेसच्या समर्थनात पोस्ट टाकत असावेत. कारण महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी ज्या पद्धतीने भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची सोशल मीडियावर धूळधाण केली गेली, ते पाहता प्रत्यक्ष निकालाने काँग्रेस आणि इतर मित्रपक्ष गारदच व्हायला हवे होते. काँग्रेसने फार दुःख करून घेतले असे दिसत नाही. कारण त्याच दिवशी प्रियंका गांधी केरळमधून संसदेत गेल्याचा आनंद काँग्रेसला झाला होता. तो आनंद गगनात मावेना इतका होता. झारखंडमध्ये भाजपला रोखता आले त्याचाही आनंद काँग्रेस विसरून गेली. प्रियंका गांधी संसदेत आल्या यावरच काँग्रेस आनंदी होती. काँग्रेसच्या या आनंदामुळे त्या पक्षाच्या प्राधान्यक्रमांमध्ये काहीतरी बदल झाले आहेत, हे पुन्हा एकदा दिसून आले.

गोव्यात ‘गृहआधार’, महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण’, मध्य प्रदेशात ‘लाडली बहन’ या योजनांमधून महिलांना प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत तसेच ओडिशामध्ये ‘सुभद्रा योजने’तून वर्षाला १० हजार देण्याची योजना देत भाजपशासित राज्यांनी महिलांना आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनवला. उमेदवारी कितीही महिलांना देवोत, पण घरटी एका महिलेला आर्थिक मदत देऊन पुरुषसत्ताक मतदान प्रक्रियेवर महिलांचे वर्चस्व आणून संपूर्ण निवडणुकीचा मूड बदलण्याची किमया भाजप करत आली आहे. आपल्या योजनांच्या जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपये खर्च करून भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने अनेक राज्ये काबीज केली. आता हरयाणासारख्या राज्यातही अशीच मासिक आर्थिक मदतीची योजना देण्याचे भाजपने आपल्या जाहिरनाम्यात सांगितले आहे. तामिळनाडूत प्रत्येक महिलेला महिन्याला एक हजार रुपये देण्याची योजना आहे. पश्चिम बंगालात महिन्याला एक हजार रुपयेपर्यंत मासिक मानधन देण्याची योजना आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा प्रभाव पाहता यापुढे काँग्रेसच नव्हे तर इतर पक्षांनाही सामाजिक सुरक्षा योजनांवर भर द्यावा लागेल. निवडणुका अशाच प्रलोभनांनी जिंकण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. काँग्रेसला किंवा अन्य पक्षांना या गोष्टींपासून आपले राजकारण वेगळे ठेवता येणार नाही. काँग्रेसने बदलत्या काळात बदलत्या समाज व्यवस्थेची नस ओळखावी लागेल. काँग्रेस त्या स्थितीत आहे असे दिसत नाही. कर्नाटक, तेलंगणासारख्या राज्यात लोकोपयोगी गोष्टींवर भर द्यावा लागेल. कर्नाटकात बीपीएलमधील महिलांसाठी असलेल्या योजनेचे निकष बदलून ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत अशा सर्व घटकांना मिळेल, अशी तरतूद करावी लागेल. महाराष्ट्राच्या निकालातून काँग्रेसने जनतेच्या जवळ जाण्यासाठी जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी आपल्या आणि मित्रपक्षांची सत्ता असलेल्या राज्यांना विकासाचे मॉडेल राज्य म्हणून पुढे आणावे लागेल, तरच भविष्यात काँग्रेसला चांगले दिवस येऊ शकतात.