सीरियातील लोकांना सध्या एका अभूतपूर्व संकटाला तोंड द्यावे लागत आहे. तीव्र दुष्काळ, पाण्याचा प्रचंड तुटवडा यामुळे सीरियातील लाखो सर्वसामान्य लोक हवालदिल झाले आहेत. तुर्कीने सीरियाच्या ईशान्य भागात केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे तिथल्या १० लाख लोकांचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित झाला आहे. आधीच वर्षानुवर्षे सुरू असलेल्या यादवी युद्धामुळे आणि हवामान बदलामुळे पडलेल्या चार वर्षांच्या तीव्र दुष्काळामुळे हा प्रदेश त्रस्त होता. त्यात आता तुर्कीच्या हल्ल्यामुळे या प्रदेशातील मानवीय संकटात आणखी भर पडली आहे.
या भागात आधीच पाण्याचा तुटवडा त्यात गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात विजेशी निगडित पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यामुळे या प्रदेशातील ‘अलूक’ या मुख्य पाणी पुरवठा केंद्राला होणारा विजेचा पुरवठा बंद झाला. तेव्हापासून हे पाणी पुरवठा केंद्र बंद आहे. त्यामुळे इथल्या लोकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या भागात तीव्र दुष्काळ त्यात पाण्याचे अपुरे, खराब व्यवस्थापन आणि त्यासाठीच्या पायाभूत सुविधांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे येथील परिस्थिती आणखीच बिघडली आहे.
‘तुर्की आमच्या लोकांचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे’, असा आरोप ऑटोनॉमस अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ नॉर्थ अँड ईस्ट सीरियाने यापूर्वी केला होता. सीरियाच्या हसाकेह प्रांतातील १० लाखांहून अधिक लोक पाणी पुरवठ्यासाठी अलूकवर अवलंबून होते. ते आता सुमारे १२ मैल अंतरावरून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहेत. या भागात दररोज पाण्याच्या टँकरच्या शेकडो खेपा केल्या जातात. पाणी पुरवठा करणारे व्यवस्थापन पाण्याचे वितरण करताना शाळा, अनाथाश्रम, हॉस्पिटल आणि अत्यंत गरजू लोकांना प्राधान्य देतात. मात्र, येथे टँकरद्वारे केला जाणारा पाणी पुरवठा प्रत्येकासाठी पुरेसा नाही.
तुर्की आणि सीरियामधील संघर्षामुळे सीरियातील लोकांना आधीच बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत असताना, हवामान बदलामुळे त्यांच्यासमोरील संकट आणखी भीषण झाले आहे. २०२० पासून ईशान्य सीरिया आणि इराकच्या काही भागांमध्ये तीव्र आणि अपवादात्मक कृषी-दुष्काळाचा विळखा पडला आहे. तुर्की सरकारचा दावा आहे की ईशान्य सीरियामध्ये जे पाण्याचे संकट आहे ते हवामान बदलामुळे आणि त्या भागातील पाण्याच्या पायाभूत सुविधांच्या देखभालीकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यामुळे निर्माण झालेले आहे.