सदैव योगामध्ये स्थिर राहा !

एकाएकी जर अंतकाळ आला, तर कुणाला कोणता मार्ग लाभेल हे कसे कळणार? समजा नको तोच मार्ग वाट्याला आला आणि तोज जर सारखा सारखा येऊ लागला, तर काय घ्या? मग यावर उपाय काय? या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणताहेत, यासाठी आपणच योगयुक्ततेने ब्रह्म होणे!

Story: विचारचक्र |
17th November, 11:22 pm
सदैव योगामध्ये स्थिर राहा !

मागील लेखांत आपण श्रीमद्भगवद्गीतेच्या आठव्या अध्यायाच्या पंचवीसाव्या श्लोकाच्या विस्तृत विवेचनाच्या अर्ध्यावर आलो होतो. तिथून पुढील भागाकडे आता वळूया.

चैतन्यत्व आणि चैतन्यहीनत्व यांच्या संधिकालाच्या त्या धुरकटपणात जीवाचे मन, बुद्धी आणि सगळी इंद्रिये कोंडून जातात. परिणामत: स्मृती लुप्त होते. त्यामुळे ब्रह्मपद प्राप्त्यर्थ जो प्रयास व सराव जीवाने त्या जन्मात केलेला असतो, तो साहजिकच विस्मृतीत जातो! अर्थातच, हातात जे होते तेच हरवून गेल्याने त्याचा लाभ तो आता काय आणि कसा होणार? तेव्हा त्यावेळी देहाची दशा ही अशी होते. अशामध्ये बाहेर सुद्धा रात्र झालेली असते. त्यातून मासांतर्गत कृष्ण पक्ष चालू असतो आणि अयनांमध्ये दक्षिणायनाचा (म्हणजे पूर्व क्षितिजाच्या मध्यबिंदूपासून दक्षिणेकडील भागात सूर्योदय होण्याचा किंवा सूर्य आकाशातील कर्क राशीमधून ते मकर राशीपर्यंत भ्रमण करण्याचा; अर्थात् २२ जुलै ते २२ डिसेंबर हा इसवी-सनाचा सहा महिन्यांचा काळ चालू असतो. 

हे अर्जुना, अंतकाळी देह ठेवते वेळी हे उपरोल्लेखित सगळे योग जुळून आले असता त्या जीवाची ब्रह्मप्राप्तिवार्ता दूरच राहते. ते योग त्या जीवास जन्म-मरणाच्या फेऱ्यांत घालतात. त्या योग्यास चंद्रलोकी जावे लागते आणि तिथून मग तो परत मागुता येऊन जन्म-संसाराच्या फेऱ्यांत पडतो. म्हणून ज्याला अकाळ किंवा अयोग्य काळ असे मागे म्हटलेय, तो तू तत्वतः हाच काळ असे समज. याला 'धूम्रमार्ग' असेही म्हणतात. या काळात देह ठेवला तर त्या योग्यास पुनर्जन्म घ्यावा लागतो. दुसरा जो 'अर्चिरादि मार्ग' सांगितलाय, तो त्या मानाने सर्वथा सोपा, उत्तम व मोक्षदायी होय.

शुक्लकृष्णे गती ह्येते जगत: शाश्वते मते।

एकया यात्यनावृत्तिमन्ययाssवर्तते पुन:।।२६।।

सरळ अर्थ : कारण जगातील हे दोन प्रकारांचे शुक्ल व कृष्ण अर्थात् देवयान व पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत. त्यापैकी एका मार्गाने (अर्चिरादी मार्गाने) गेलेला परत न येणाऱ्या परम गतीला पोचतो आणि दुसऱ्या मार्गाने (धूम्रमार्गाने) गेलेला पुन्हा परत येतो (म्हणजे जन्म घेतो आणि मृत्यू पावतो.)

विस्तृत विवेचन : पार्था, एक सरळ मार्ग आणि एक आडमार्ग अशा दोन्ही मूळच्याच वाटा माहिती असाव्यात म्हणून तुला मुद्दाम सांगितल्या. सत्य काय आणि मिथ्या काय, योग्य काय आणि अयोग्य काय, आणि आपले हित नेमके कशात आहे, हे जाणण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. समोर मोठा डोह आहे. तो ओलांडून पलिकडे जायचे आहे व त्यासाठी तिथे काठावरच नाव बांधून ठेवलेली दिसत आहे. असे असताना पलिकडे जाण्यासाठी नावेत न बसता त्या महाडोहात कोण उडी मारेल? चांगला सुयोग्य राजमार्ग माहीत असूनही कोणी काट्याकुट्यांनी भरलेल्या अवघड आडमार्गाने जाईल का? जो अमृत आणि विष यांना ओळखतो, तो कधी अमृत सोडून विष पिण्यास धजेल का? तसे ज्याला चाली सरळ सोपी उजळ वाट माहीत आहे, तो सहसा आडवाटेने जात नाही. तेव्हा योग्य काय व अयोग्य काय हे नीट पारखून अकाळाच्या या संकटावर मात करावी. कारण अंतकाळी देह ठेवताना पुढील मार्गाच्या योग्यायोग्यतेबद्दल मनात भ्रान्ती निर्माण होऊन जर 'अकाळाचे' संकट ओढवले, अर्चिरादी पंथ चुकवून जर योगी अकस्मात् धूम्रमार्गात पडला, तर जीवनात कष्टाने साध्य केलेला योगाभ्यास निरुपयोगी ठरून फुकट जाण्याची शक्यता निर्माण होते. आणि मग त्यावर संसाररूपी चक्रात परत परत फिरत बसण्याची वेळ येते! तसे होऊ नये म्हणून तुला दोन्ही मार्ग विस्तार करून सांगितले. एक ब्रह्मपदी नेणारा व दुसरा संसारचक्रांत अडकवणारा.

नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन।

तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ।।२७।।

सरळ अर्थ : आणि हे पार्था, याप्रमाणे या दोन्ही मार्गांना तत्वतः जाणले असता कोणीही योगी मोह पावत नाही (म्हणजे मग तो निष्काम भावानेच साधन करतो, कामनांच्या फलेच्छेच्या जाळ्यात फसत नाही). म्हणून हे अर्जुना तू सर्व काळी समत्वबुद्धीरूपी योगाने युक्त हो. अर्थात् माझ्या प्राप्तीसाठी निरंतर साधना करणारा हो.

विस्तृत विवेचन : पण अर्जुना, प्रत्यक्षात ज्याचे जसे प्रारब्ध असेल तशाच प्रकारचा मार्ग त्याला अंतकाळी मिळतो. असे जर आहे, तर मग योगी कोणत्या गतीस पावतो? ते तुला आता समजावून सांगतो, नीट ऐक.

एकाएकी जर अंतकाळ आला, तर कुणाला कोणता मार्ग (अर्चिरा की धूम्र) लाभेल हे कुणाला कसे कळणार? या मार्गाची शाश्वती काय? म्हणजे कोणता मार्ग आपल्या वाट्याला येणार आहे हे आपल्याला माहीत नसते. समजा नको तोच मार्ग वाट्याला आला आणि तोज जर सारखा सारखा येऊ लागला, तर काय घ्या? मग याच्यावर उपाय काय? या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की, यावर दुसरा उपाय आहे! तो कोणता? तर आपणच योगयुक्ततेने ब्रह्म होणे!

नकोत ते मार्ग! (याच जन्मी ब्रह्म झालो तर) आता देह असो किंवा नसो, आपण तर ब्रह्मच झालोत! म्हणजे जसा काही वेळा दोरखंड सर्पासारखा भासतो, तसा हा शरीराचा मिथ्या आभास! पाण्याला कधी तरंगाचे किंवा लाटेचे, लहरींचे भान असते का? ते तर पाणीच असते! लाट उसळल्यावर ते जन्माला येत नाही आणि लाट ओसरल्यावर ते मृत्यू पावत नाही. ते पाणीच असते आणि पाणीच राहते. त्याच प्रमाणे जे देह प्राप्त असतानाच नाम-रूपाचा भ्रम सांडून परब्रह्म झालेत, ज्यांच्यासाठी त्या शरीराची आता आडनाव रूपाने देखील ओळख उरलेली नाही, त्यांच्या दृष्टीने, हे अर्जुना, जन्म काय, मरण काय, देश काय आणि काळ काय? ब्रह्म-रूप झाल्याने ते स्वतःच हे सगळे होऊन बसलेत! मग कशाला ते मार्ग शोधायला हवेत आणि कुठून कुठे जायला हवे? एखादे मडके फुटल्यावर त्यातले जे आकाश असते ते बाहेरच्या आकाशपोकळीत लीन होते. पण ते जेव्हा फुटलेले नसते, तेव्हा त्यातले आकाश (म्हणजे पोकळी व हवा) काय आकाशाशी एकरूप नसतात काय?(क्रमश:)


- मिलिंद कारखानीस

(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल 

असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)

मो. ९४२३८८९७६३