शुद्ध, अचूक उच्चार

आकाशवाणीचाच एक न्यूज रीडर सकाळी आठ वाजता इंग्रजीची स्टायल मारत ‘मोर्निंग न्यूज’ म्हणत होता. ‘मोर्निंग’ म्हणजे शोक, दुखवटा. इथं ‘मॉर्निंग न्यूज’ असा उच्चार हवा.

Story: ये आकाशवाणी है |
17th November, 12:21 am
शुद्ध, अचूक उच्चार

आकाशवाणीच्या बातम्या वाचताना एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे उच्चार. चुकीचा उच्चार केला तर त्याचं समर्थन होऊ शकत नाही. उच्चार स्वच्छ, स्पष्ट पाहिजे. एकदा एक न्यूज रीडर भडकमकर या आडनावाचा उच्चार करताना “भडक भडक भड” असं उच्चारत राहिला व शेवटी त्याने “विचित्र भडंगकर” असं काहीसं म्हटलं. नंतर मी त्याला समजावलं की भड-कम-कर असंच लिहून ने म्हणजे हा गोंधळ होणार नाही. त्या नावाभोवती वर्तुळ काढ म्हणजे त्यावेळी तू सचेत होणार की हा उच्चार आपल्याला व्यवस्थित करायला पाहिजे. 

विद्यालय, विद्या, विद्यापीठ या शब्दांतील ‘द्या’ चा उच्चार ‘ध्या’ असं सर्रासपणे केला जातो. तिथं ‘ध्यास’ शब्दांतला ‘ध्या’ चालत नाही, पण तरीही अऩेक न्यूज रीडर ही चूक करतच असतात. ‘मुद्द्या’वर बोलणं झालं. ‘मुध्या’वर नव्हे. ‘अद्ययावत’ (updated) हा उच्चार ‘अध्ययावत’ असा केला जातो, जो चुकीचा आहे. Source या शब्दाला पर्यायी शब्द ‘स्रोत’ हा आहे. इथेही अनेक जण गफलत करून ‘स्त्रोत’ असा चुकीचा उच्चार करतात. 

कोंकणीत २३ संख्येला काही जण ‘त्रेवीस’ म्हणतात. त्याचा खरा उच्चार ‘तेवीस’ असा आहे. 

हे कोंकणी वाक्य बघा - ‘पोटतिडकीन (तळमळीने) ताणें सेवा केली.’ यात ‘पॉटतिडकीन’ असा उच्चार होतो. ‘पोट’ (stomach) याचा उच्चारही ‘पॉट’ असा होतो. मराठीत ‘पोट’ होतो तसा नव्हे. 

कोंकणीत ‘धांपते’ आणि ‘उक्ते’ उच्चार असतात.
हे वाक्य पहा - ‘रथ आयलो. रथांतल्यान राजा देंवलो.’
दोन वाक्यातील दोन्ही ‘र’ चे उच्चार वेगवेगळे होतात. हे उच्चार मराठीत नाहीत.
‘बस आयली. तो बसींत चडलो.’
या दोन वाक्यातील ‘ब’ चे उच्चार वेगवेगळे होतात. 

एक निवेदक ‘काटकसर’ या शब्दाचा उच्चार ‘काटक सर’ असा करायचा. ‘काट-कसर’ शब्द लिहून देऊन त्याची प्रॅक्टीस करायला त्याला मी सांगितलं. कारण तो मुकेश सर, शेखर सर म्हणावं तसं सवयीने ‘काटक-सर’ म्हणतच आला होता. 

‘संचालनालय’ हा शब्द सुध्दा असाच. वृत्त निवेदकांना चकवा देणारा. त्याला प्रत्यय लागून येतो तेव्हा तर तो आव्हानात्मक ठरतो. ‘संचालनालयाच्या सभागृहात’ अशी सुरूवात वगैरे असली, तर पहिल्याच शब्दाला घसरण्याची शक्यता असते. तो शब्द अधोरेखित करून काळजी घ्यावी लागते. प्रॅक्टीस करावीच लागते. मनातल्या मनात शब्द वाचून नव्हे, तर मोठ्याने उच्चार करून ती केली पाहिजे. 

‘संसद’ या शब्दाचा उच्चार कोंकणीत ‘संवसद’ असा होतो. हिंदीत तो ‘संसद’ होतो. काही जण तो हिंदीतल्या ‘संसद’ सारखा करतात. ‘तुरूंग’ शब्दाला कोंकणीत पर्यायी शब्द ‘बंदखण’ असा आहे. त्याचा उच्चार ‘बनखण’ असा होतो. ‘बंद-खण’ हा उच्चार योग्य नव्हे. काही लोक तुरूंगसाठी ‘कादय’ हा शब्द वापरतात. त्याचा उच्चार ‘कादयेंल्यान’ म्हणताना ‘काद-येंतल्यान’ असा चुकीचा केला जातो. तो उच्चार ‘का-दयेंतल्यान’ असा हवा.

आकाशवाणीचाच एक न्यूज रीडर सकाळी आठ वाजता इंग्रजीची स्टायल मारत ‘मोर्निंग न्यूज’ म्हणत होता. ‘मोर्निंग’ म्हणजे शोक, दुखवटा. इथं ‘मॉर्निंग न्यूज’ असा उच्चार हवा. त्याला वरीष्ठांनी नंतर समजावलं.

खालील मराठी वाक्ये बघा-
‘कचरा आणला. कचऱ्याची पेटी वर ठेवली.’   
या दोन वाक्यांचा कोंकणी अनुवाद असा होईल.
‘कोयर हाडलो. कोयराची पेटी (कास) वयर दवरली.’

पहिल्या वाक्यात ‘को’ उच्चार सर्वसाधारण मराठीसारखा होतो. ‘कोयराची पेटी’ याचा उच्चार ‘कॉयराची पेटी’ असा होतो. 

उच्चार व्यवस्थित करायचा सराव हवा. वाचन, चिंतन, मनन हवं. विविध भाषांचं आणि आपल्या भाषेचं  बारकाईने वाचन व श्रवण हवं. यातूनच आपली समज, स्पष्टता वाढत जाते!


मुकेश थळी 
(लेखक बहुभाषी साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत)